अहमदाबाद : अहमदाबाद येथील हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात विकेटने सहज पराभव केला. आधी गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानला १९१ धावांत रोखले. त्यानंतर रोहित शर्माच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर १९२ धावांचे आव्हान ३०.३ षटकात ७ विकेट राखून सहज पार केले. भारताकडून रोहित शर्माने ८६ धावांची खेळी केली. त्याशिवाय श्रेयस अय्यर यानेही संयमी अर्धशतक ठोकले. विश्वचषकातील भारताचा हा सलग तिसरा विजय होय. तर पाकिस्तानविरोधातील भारताचा हा आठवा विजय आहे. विश्वचषकात पाकिस्तानविरोधात भारत अजेय राहिलाय. तर यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तानचा हा पहिला पराभव आहे.
पाकिस्तानच्या १९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने वादळी सुरुवात केली. रोहित शर्मा आणि गिल यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. डेंग्यूतून सावरल्यानंतर गिल पाकिस्तानच्या गोलंदाजीवर तुटून पडला होता. गिल याने चार चौकारांच्या मदतीने १६ धावांची खेळी केली. गिल याला शाहीन आफ्रिदीने बाद केले. त्यानंतर अनुभवी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी डाव सावरला. दोघांची जोडी जमली असे वाटत असतानाच विराट कोहलीला हसन अली याने बाद केले. विराट कोहलीने १८ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने १६ धावांचे योगदान दिले.
रोहित शर्मा एका बाजूने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करतच होता. रोहित शर्माने अवघ्या ३६ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. शाहीन शाह आफ्रिदीच्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. तोपर्यंत सामना भारताच्या बाजूने झुकला होता. रोहित शर्माने ३६ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. या खेळीला ६ चौकार आणि ६ षटकारांचा साज होता. रोहित तंबूत परतल्यानंतर अय्यरने केएल राहुलच्या साथीने भारताला विजय मिळवून दिला.
पाकिस्तानला १९१ धावांवर गुंडाळला
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय भारतीय गोलंदाजाने आपल्या कामगिरीने सार्थ ठरवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज,जसप्रीत बुमराह यांच्यासह अष्टपैलू हार्दिक पंड्याचा भेदक मारा, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाच्या फिरकीच्या जादूसमोर पाकिस्तानचा डाव पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. कर्णधार बाबर आझम आणि स्टार फलंदाज रिझवान या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने १९१ धावांपर्यंत मजल मारली होती. ३० षटकांत पाकिस्तानच्या ३ बाद १५६ धावा होत्या. यानंतर अवघ्या ३३ धावांत पाकिस्तानने ६ गडी गमावले. पाकिस्तानच्या संघ अवघ्या ४२.५ षटकांमध्येच तंबूत परतला. मोहम्मद सिराज,जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी घेत अवघ्या १९१ धावांवर पाकिस्तानला रोखले. पाकिस्तानचा डाव ४३ व्या षटकांमध्येच संपुष्टात आला.