पुणे : शेवटच्या चेंडूवर विराट कोहलीने ठोकलेला शानदार षटकार आणि केलेल्या शतकी खेळीने संघाला ‘विराट’ विजय मिळवून देत विजयाचा ‘चौकार’ साजरा केला. त्याला शुभमन गिलची अर्धशतकी खेळी तर हिटमॅनची तडाखेबाज फलंदाजीने साथ दिली. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करून बांगला देशला 256 धावांत रोखल्यानंतर विराट कोहली (103*), शुभमन गिल (53) आणि रोहित शर्मा (48) यांनी बांगला टायगर्सचा फडशा पाडला. विराटला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.
गहुंजे स्टेडियम येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या सामन्यात बांगला देश संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मा याने पहिल्याच षटकात रोहितने दोन चौकार ठोकत दमदार सुरुवात केली. रोहित याने तडाखेबाज फलंदाजी करताना 40 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 48 धावा केल्या. रोहितने हसन महमूद याच्या 13 व्या षटकामध्ये षटकार ठोकला. तसाच चेंडू पुन्हा षटकार मारण्याच्या प्रयत्नात बाँड्रीवर असलेल्या तौहिद हिरदॉय याने झेल पकडला.
रोहित बाद झाला त्यावेळी भारताच्या 88 धावा झाल्या होत्या. त्यानंतर विराट कोहलीसमवेत शुभमन गिल याने 44 धावांची भागीदारी रचली. शुभमन याने ही तडाखेबाज फलंदाजी करताना 55 चेंडूंत 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला मेहदी हसन याने महमदुल्लाह रियाद करवी झेलबाद केले. शुभमन याने दोन षटकार आणि पाच चौकार मारले.
श्रेयस अय्यर याने विराट कोहलीबरोबर मैदानावर सुरुवात करताना सावध खेळी केली. परंतु, श्रेयसला चमकदार कामगिरी दाखविता आली नाही. 25 चेंडूंत दोन चौकारासह केवळ 19 धावाच करता आल्या. त्याला मेहदी हसन याच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात महमदुल्लाह रियाद करवी झेलबाद झाला. त्यावेळी संघाच्या 30 व्या षटकात 3 बाद 178 धावा झालेल्या होत्या. त्यानंतर विराट आणि के. एल. राहुल यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. या दोघांनी 83 धावांची दमदार भागीदारी रचत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. भारताच्या विजयाला दोन धावा हव्या असताना विराटला शतकासाठी 3 धावा हव्या होत्या. यावेळी त्याने उत्तुंग षटकार ठोकत आपले शतक पूर्ण करताना संघाला विजय मिळवून दिला. विराटने 97 चेंडूंत नाबाद 103 धावांची खेळी करताना 6 चौकार आणि 4 षटकारांची आतषबाजी केली. त्याला के. एल. राहुल याने 34 चेंडूंत 34 धावांची सुरेख साथ देऊन 3 चौकार आणि 1 षटकार मारला.
तत्पूर्वी बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन दुखापतीमुळे हा सामना खेळू शकला नाही. त्याच्या जागी संघाचे नेतृत्व करणाऱ्या नझमुल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तनजीद हसन आणि लिटन दास यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनी पॉवरप्लेमध्ये 63 धावा जोडल्या. बांगलादेशची पहिली विकेट 93 धावांवर पडली. तंजिद 43 चेंडूत 51 धावा करून बाद झाला. कुलदीप यादवने त्याला पायचीत केले. यानंतर कर्णधार नजमुल आठ धावा करून जडेजाचा बळी ठरला. महेदी हसनला तीन धावांवर सिराजने बाद केले. यानंतर लिटन दासही 66 धावा करून जडेजाचा बळी ठरला.
पहिली विकेट 93 धावांवर गमावलेल्या बांगलादेशची अवस्था 4 बाद 137 अशी झाली. यानंतर मुशफिकूर रहीमने तौहीद हृदयॉयसह डावाची धुरा सांभाळली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. शार्दुलने 16 धावांवर तौहीदला बाद केले. रहीमही 38 धावा करून बुमराहचा बळी ठरला. अखेरीस महमुदुल्लाहने 36 चेंडूत 46 धावा करत संघाची धावसंख्या 250 धावांच्या जवळ नेली. शेवटच्या षटकात बुमराहने महमुदुल्लाहला अर्धशतक करू दिले नाही आणि त्याला शानदार यॉर्करवर त्याचा त्रिफळा उडवला. शरीफुलने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत बांगलादेशची धावसंख्या 256 धावांपर्यंत नेली.