Monday , December 8 2025
Breaking News

२० वर्षांचा ‘दुष्काळ’ संपला! न्यूझीलंडला पराभवाचा ‘पंच’ मारून टीम इंडिया ‘टेबल टॉपर’

Spread the love

 

धरमशाळा : डॅरेल मिचेलचे शतक (१३०) आणि राचिन रविंद्रचे अर्धशतक (७५) यांच्या बळावर न्यूझीलंडने भारताला २७४ धावांचे आव्हान दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना ‘चेसमास्टर’ विराट कोहलीने लौकिकाला साजेसा खेळ केला. शेवटपर्यंत पिचवर तळ ठोकून विराटने भारताला यंदाच्या विश्वचषकात सलग पाचवा विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने विश्वचषकातील न्यूझीलंडविरूद्धचा विजयाचा दुष्काळ संपवला. याआधी टीम इंडियाने २००३ साली न्यूझीलंडचा शेवटचा पराभव केला होता.

२७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुबमन गिलने भारताला वेगवान सुरूवात करून दिली. रोहितने ४ चौकार आणि ४ षटकारांसह ४० चेंडूत ४६ धावा केल्या. त्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले. शुबमन गिलदेखील २६ धावांवर बाद झाला. श्रेयस अय्यर आणि केएल राहुलला देखील चांगली सुरूवात मिळाली. पण अय्यर ३३ धावांवर तर केएल राहुल २७ धावांवर माघारी परतले. वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना खेळणारा सूर्यकुमार यादव गोंधळाचा बळी ठरला. विराटने धाव घेण्यास नकार दिल्याने त्याने आपल्या विकेटचे बलिदान दिले. त्यानंतर मात्र विराटने रविंद्र जाडेजाच्या साथीने भारताचा सलग पाचवा विजय साजरा केला.

तत्पूर्वी, रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने सलामीवीर डेवॉन कॉनवेला शून्यावर माघारी पाठवले. त्यानंतर मोहम्मद शमीने दुसरा सलामीवीर विल यंगला 17 धावांवर त्रिफळाचीत केले. 19 धावांत दोन बळी गमावल्यानंतर, न्यूझीलंडच्या डावात मोठी भागीदारी झाली. रचिन रवींद्र आणि डॅरेल मिचेल जोडीने दीडशतकी भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. 12 धावांवर रचिन रवींद्रचा झेल जडेजाकडून सुटला. त्याने 87 चेंडूंत 6 चौकार आणि एक षटकार खेचत 75 धावा केल्या. रचिन आणि मिचेल यांनी संघाच्या धावसंख्येत 159 धावांची भर घातली.

रचिन बाद झाल्यावर डॅरेलने एक बाजू लावून धरली आणि संघाला 250 पार मजल मारून दिली. डॅरेल मिचेलने तुफानी फटकेबाजी करत 100 चेंडूंत शतक पूर्ण केले, पण त्याला दुसर्‍या फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. डॅरेल मिचेलने शेवटपर्यंत झुंज दिली. अखेर शेवटच्या षटकांत तो 127 चेंडूंत 130 धावा काढून बाद झाला. त्याने 9 चौकार आणि 5 षटकारांनी खेळी सजवली.

शेवटच्या आठ षटकांत भारतीय गोलंदाजांनी झटपट विकेटस् घेत सामन्यात पुनरागमन केले. गोलंदाजीत मोहम्मद शमीच्या भेदक मार्‍यापुढे न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. शमीने विल यंग, रचिन रवींद्र, डॅरेल मिचेल, सँटेनर आणि हेन्री या पाच फलंदाजांना माघारी धाडले. त्याने आपल्या 10 षटकांमध्ये 54 धावा देत 5 बळी मिळवले. कुलदीप यादवने 2, तर बुमराह-सिराजने 1-1 बळी टिपला.

About Belgaum Varta

Check Also

भारताने पाकिस्‍तानला लोळवले : एशिया चषकावर नाव कोरले

Spread the love  दुबई : दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कप २०२५ मधील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *