Wednesday , December 10 2025
Breaking News

भारताच्या विजयी ‘षटकार’, इंग्‍लंडचा धुव्‍वा उडवत भारताचा सलग सहावा विजय

Spread the love

 

लखनऊ : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाने घोडदौड कायम राखताना विजयी षटकार खेचला. २२९ धावांचा बचाव भारतीय संघ करेल की नाही अशी शंका मनात आली होती, पण मोहम्मद शमीने (४-२२) पुन्हा एकदा कमाल केली. जसप्रीत बुमराह ( ३-३२), कुलदीप यादव (२-२४) आणि रवींद्र जडेजाची (१-१६) त्याला साथ मिळाली. गतविजेत्या इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवून भारताने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. पण, गतविजेत्यांचे आव्हान आता अधिकृतपणे संपुष्टात आले आहे.

जॉनी बेअरस्टो व डेवीड मलान यांनी ३० धावांची सलामी दिली होती, परंतु जसप्रीत बुमराहने सलग दोन चेंडूंत मलान (१६) आणि जो रूट (०) यांना माघारी पाठवले. त्यानंतर मोहम्मद शमीने बेन स्टोक्स (०) आणि बेअरस्टो (१४) यांचा त्रिफळा उडवला. जलद माऱ्यानंतर रोहितने फिरकीपटूंना आणले आणि कुलदीप यावदने अप्रतिम चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरचा (१०) त्रिफळा उडवला. इंग्लंडचा निम्मा संघ १५.१ षटकांत ५२ धावांवर तंबूत परतला.

शमीला पुन्हा गोलंदाजीचा आणण्याचा रोहितचा निर्णय योग्य ठरला आणि त्याने मोईन अलीला (१५) बाद करून इंग्लंडला सहावा धक्का दिला. जखमी लिएम लिव्हिंगस्टोन मैदानावर फटकेबाजी करत होता आणि कुलदीपच्या गोलंदाजीवर तो पायचीत झाला असता. पण, कुलदीपने डीआरएस घेण्यास नकार दिला आणि नंतर रिप्लेत चेंडू स्टम्पवर आदळल्याचे दिसले. त्यानंतर रोहित फिरकीपटूवर नाराज झाला. रवींद्र जडेजाने इंग्लंडला सातवा धक्का देताना ख्रिस वोक्सला (१०) यष्टीचीत केले. पण, कुलदीपनेच लिव्हिंगस्टोनची (२७) विकेट मिळवली. शमीने आणखी एक धक्का दिला आणि आदील राशीद (१३) माघारी परतला. बुमराहने शेवटची विकेट घेऊन इंग्लंडचा संघ ३४.५ षटकांत १२९ धावांत तंबूत पाठवला. भारताने १०० धावांनी विजय मिळवला.

तत्पूर्वी, शुबमन गिल (९), विराट कोहली (०) आणि श्रेयस अय्यर (४) माघारी परतल्याने भारताची अवस्था ३ बाद ४० अशी झाली होती. रोहित शर्मा व लोकेश राहुल (३८) यांनी चौथ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी रोहितसह सूर्यकुमार यादवने (४९) ३३ धावांची भागीदारी केली. रोहित १०१ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ८७ धावांवर झेलबाद झाला. जसप्रीत बुमराहने (१६) चांगला खेळ करताना संघाला ९ बाद २२९ धावांपर्यंत पोहोचवले. डेव्हिड विलीने ३, तर ख्रिस वोक्स व आदील राशीद यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

About Belgaum Varta

Check Also

भारताने पाकिस्‍तानला लोळवले : एशिया चषकावर नाव कोरले

Spread the love  दुबई : दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कप २०२५ मधील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *