कोलकाता : वनडे वर्ल्डकपच्या राऊंड रॉबीन लीगमध्ये भारतानंतर दुसर्या क्रमांकाचा यशस्वी संघ म्हणून गणला गेलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाने ऐन मोक्याच्या क्षणी कच खाल्ली. कोलकाता येथे सेमीफायनल लढतीत ऑस्ट्रेलियाने त्यांच्यावर 3 विकेट्सने निसटता विजय मिळवून आठव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. आता 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीनवेळचा विश्वविजेता भारत आणि पाचवेळचा ऑस्ट्रेलिया या दोन संघात अंतिम सामना रंगणार आहे.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. कांगारूंच्या मा-यापुढे प्रोटीस संघाने लोटांगण घातले, ज्यामुळे त्यांचा डाव 212 धावांत संपुष्टात आला. डेव्हिड मिलर खेळला नसता तर आफ्रिकेला तेवढ्याही धावा करता आल्या नसत्या. ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्क व जोश हेझलवूड यांनी पहिल्या 13 षटकांत दक्षिण आफ्रिकेला 4 धक्के दिले. स्टार्क व हेझलवूड यांच्या भेदक मार्यासमोर आफ्रिकेची मजबूत फलंदाजांची फळी ढेपाळली. डेव्हिड मिलर आणि हेन्रीच क्लासेन यांनी 95 धावांची भागीदारी करून संघाला सुस्थितीत आणले. या दोघांसमोर प्रमुख गोलंदाज अपयशी ठरत असताना पार्ट टाईम गोलंदाज ट्रॅव्हिस हेडने कमाल केली. मिलर व कोएत्झी यांची 53 धावांची भागीदारी पॅट कमिन्सने तोडली. कोएत्झी 19 धावांवर झेलबाद झाला; परंतु त्याने डीआरएस घेतला असता तर तो नाबाद राहिला असता.
Belgaum Varta Belgaum Varta