भारताने तिसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली. २०१८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने आफ्रिकेत वन डे मालिका जिंकली होती. त्यानंतर लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली आज भारताने ही कमाल करून दाखवली. मोहम्मद अझरुद्दीन, राहुल द्रविड व महेंद्रसिंग धोनी यांनाही हा पराक्रम करता आला नव्हता. संजू सॅमसनचे शतक, तिलक वर्मा व लोकेश राहुल यांच्या उपयुक्त खेळीने विजयाचा पाया रचला. त्यानंतर गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली.
संजू सॅमसनने शतक झळकावून भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. तिलक वर्मा व लोकेश राहुल यांनी संजूला दमदार साथ दिली. संजूने कर्णधार लोकेश राहुलसह (२१) ५२ धावांची भागीदारी करून डाव सावरला. त्यानंतर संजू व तिलक वर्मा यांनी ११६ धावांची भागीदारी केली. तिलक ७७ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५२ धावांवर बाद झाला. संजूने ११४ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १०८ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर (१४) व अक्षर पटेल (१) मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात बाद झाले. रिंकू सिंग (२७ चेंडूंत ३८ धावा) व अर्शदीप सिंग (२ चेंडूंत ७ धावा) यांनी शेवटपर्यंत खेळ करून संघाला ८ बाद २९६ धावांपर्यंत पोहोचवले.
प्रत्युत्तरात रिझा हेंड्रिक्स व टॉनी डी जॉर्जी यांनी ५९ धावांची सलामी दिली. अर्शदीप सिंगने भारताला पहिले यश मिळवून देताना हेंड्रिक्सला (१९) बाद केले. अक्षर पटेलेने १५व्या षटकात रॅसी व्हॅन डेर ड्युसेनचा (२) अडथळा दूर केला. पण, मागील सामन्यातील शतकवीर जॉर्जीने अर्धशतक झळकावून भारतासमोर आव्हान उभे केले. जॉर्जी आणि एडन मार्करम यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६७ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी करून आफ्रिकेचा डाव सावरला होता. वॉशिंग्टन सुंदरने ही जोडी तोडली. रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात मार्करामच्या (३६) ग्लोव्हजला चेंडू लागून लोकेश राहुलच्या हाती विसावला. ३०व्या षटकात अर्शदीप सिंगने महत्त्वाची विकेट घेतली. ८७ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारासह ८१ धावा करणारा जॉर्जी पायचीत झाला.
जॉर्जीच्या विकेटनंतर भारतीय गोलंदाजांनी कमबॅक केले. आवेश खानने हेनरिच क्लासेलला (२१) बाद करून आफ्रिकेला मोठा धक्का दिला. यानंतर आफ्रिकेचे विकेट सत्र सुरूच राहिले. वियान मल्डर (१) व डेव्हिड मिलर (१०) यांना अनुक्रमे वॉशिंग्टन व मुकेश कुमार यांनी माघारी पाठवून यजमानांची अवस्था ७ बाद १९२ अशी केली. अजूनही ते १०६ धावांनी मागेच होते आणि हातात ३ विकेट शिल्लक होत्या. अर्शदीपने धक्कासत्र सुरू ठेवताना केशव महाराज (१४) व लिजाड विलियम्स (२) यांना माघारी पाठवले. भारताच्या विजयाची केवळ औपचारिकता शिल्लक होती. आवेश खानने सामन्यातील दुसरी विकेट घेतली आणि आफ्रिका २१८ धावांवर ऑल आऊट झाली. भारताने ७८ धावांनी मॅच अन् २-१ अशी मालिका जिंकली.