नवी दिल्ली : ”मैं अपना पद्मश्री पुरस्कार प्रधानमंत्री जी को वापस लौटा रहा हूँ. कहने के लिए बस मेरा यह पत्र है. यही मेरी स्टेटमेंट है,” असे ट्विट करून बजरंग पुनियाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) निवडणुकीचा निकाल लागताच महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्ती जाहीर केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडली. यात भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी अनिता शेओरान यांचा पराभव केला. संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी ढसाढसा रडली होती. आज बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत देत असल्याचे जाहीर केले.
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता बजरंग पुनियाने लिहिले की, आशा करतो की तुम्ही बरे असाल. तुम्ही देशाची सेवा करण्यात व्यग्र आहात. तरीही तुमचं लक्ष आमच्या कुस्तीकडे वळवण्याचा माझा प्रयत्न आहे. जानेवारीत आम्ही बृजभूषण सिंग यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करत उपोषणाला बसलो होतो, हे तर तुम्हाला माहीत असेलच. महिला कुस्तीपटूंनी सुरू केलेल्या आंदोलनात मी पण सहभागी होतो. आश्वासनानंतर आम्ही आंदोलन मागे घेतले, परंतु ३ महिने काहिच न झाल्याने आम्ही पुन्हा आंदोलनाला बसलो.
”आमचे ते आंदोलन ४० दिवस चालले होते. तेव्हा दिल्ली पोलिसांनी आम्हाला बळाचा वापर करून त्रास दिला. आम्हाला केवळ आश्वासनं मिळाली. २१ डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत बृजभूषणने पुन्हा महासंघावर कब्जा केला. महिला कुस्तीपटूंना असे अपमानित केले जात असताना हा पुरस्कार घेऊन मी जगू शकत नाही. त्यामुळे ही हा पुरस्कार परत करतोय ,” असेही त्याने लिहिले.