नवी दिल्ली : कुस्तीपटू विनेश फोगाटने मोठी घोषणा करत मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत असल्याचे जाहीर केले आहे.
भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पैलवानांनी नाराजी व्यक्त केली. वाद चिघळल्यानंतर ही समिती बरखास्त करण्यात आली. पण, साक्षी मलिकने तर कुस्तीला रामराम करत असल्याचे म्हणत निवृत्तीची घोषणा केली. बजरंग पुनियाने पद्म पुरस्कार माघारी देणार असल्याचे जाहीर केले. अशातच विनेश फोगाटने देखील आक्रमक पवित्रा घेत मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करणार असल्याची घोषणा केली आहे. तिने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहित ही माहिती दिली.
विनेश फोगाटने पोस्टद्वारे म्हटले, “माननीय पंतप्रधानजी, साक्षी मलिकने कुस्ती सोडली आहे आणि बजरंग पुनियाने पद्मश्री परत केला आहे. देशासाठी ऑलिम्पिक पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना हे सर्व करायला कोणी भाग पाडले हे साऱ्या देशाला माहीत असून, तुम्ही देशाचे प्रमुख आहात, त्यामुळे तुमच्यापर्यंत देखील ही बाब पोहोचली असेल. पंतप्रधान मोदीजी, मी तुमच्या घरची मुलगी विनेश फोगाट आहे आणि मागील एक वर्षापासून माझी काय स्थिती आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे. मला आठवते ते वर्ष २०१६, जेव्हा साक्षी मलिकने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते. तेव्हा तुमच्या सरकारने तिला ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ ची ब्रँड ॲम्बेसेडर केली होती. जेव्हा ही घोषणा झाली तेव्हा देशातील सर्व महिला खेळाडू आनंदात होत्या आणि एकमेकांना अभिनंदनाचे मेसेज पाठवत होत्या. आज साक्षीने कुस्ती सोडली असून मला ते २०१६ हे वर्ष पुन्हा पुन्हा आठवत आहे. आम्ही महिला खेळाडू फक्त सरकारी जाहिरातींवर दिसण्यासाठी आहोत काय? त्या जाहिराती प्रसिद्ध होण्यास आमचा कोणताही आक्षेप नाही, कारण त्यामध्ये लिहिलेल्या घोषवाक्यांवरून तुमच्या सरकारला मुलींच्या हितासाठी गांभीर्याने काम करायचे असल्याचे दिसते. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते, पण आता हे स्वप्न देखील धुळीस मिळत आहे. आगामी महिला खेळाडूंचे हे स्वप्न नक्कीच पूर्ण होवो, अशी मी प्रार्थना करते.”