मुंबई : आयपीएल २०२४ मधील १४वा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघात खेळला. ज्यामध्ये राजस्थानने मुंबईचा ६ विकेट्सनी पराभव करत सलग तिसरा विजय नोदंवला. त्याचबरोबर गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने राजस्थानला १२६ धावांचे लक्ष्य दिले होते, जे राजस्थानने रियान परागच्या अर्धशतकाच्या जोरावर १५.३ षटकांत सहज पार केले.
रियान परागने खेळली शानदार खेळी
राजस्थान रॉयल्सकडून रियान परागने सर्वाधिक धावा केल्या. रियान पराग ३९ चेंडूत ५४ धावा करून नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि ३ षटकार मारले. सलामीवीर यशस्वी जैस्वालने १० धावा केल्या. जोश बटलर १३ धावा करून बाद झाला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन १२ धावा करून आकाश मधवालचा बळी ठरला. रवी अश्विनने १६ धावांचे योगदान दिले. तर शुभम दुबे ८ धावा करून नाबाद परतला. मुंबई इंडियन्ससाठी आकाश मधवाल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. आकाश मधवालने ४ षटकात २० धावा देत ३ बळी घेतले. तर क्वेना माफाकाला १ यश मिळाले.
मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांचा फ्लॉप शो
तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली. मुंबई इंडियन्सचे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. रोहित शर्माशिवाय नमन धीर आणि डेवाल्ड ब्रेविस यांना खाते उघडण्यात अपयश आले. या संघाचे ४ फलंदाज २० धावांपर्यंत पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र यानंतर हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांनी चांगली भागीदारी केली. हार्दिक पंड्या २१ चेंडूत ३४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर तिलक वर्माने २९ चेंडूत ३२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
ट्रेंट बोल्ट आणि युजवेंद्र चहलची घातक गोलंदाजी
राजस्थान रॉयल्ससाठी ट्रेंट बोल्ट आणि युजवेंद्र चहल हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. ट्रेंट बोल्ट आणि युजवेंद्र चहलने ३-३ बळी घेतले. याशिवाय नांद्रे बर्गरने २ फलंदाजांना आपले बळी बनवले. तर आवेश खानने पियुष चावलाला बाद केले. या सामन्यात ट्रेंट बोल्टने एक मोठा विक्रम नोंदवला. तो आयपीएलमधील पहिल्या षटकांत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने या बाबती भुवनेश्वर कुमारला मागे टाकले.
ट्रेंट बोल्टने रचला इतिहास
राजस्थान रॉयल्सकडून पहिले षटक ट्रेंट बोल्टने टाकले. षटकाच्या ५व्या चेंडूवर त्याने एमआयच्या माजी कर्णधाराला बाद केले. संजू सॅमसनने विकेटच्या मागे रोहितचा अप्रतिम झेल घेतला. रोहितला खातेही उघडता आले नाही आणि तो गोल्डन डकचा बळी ठरला. त्याचबरोबर सहाव्या चेंडूवर त्याने नमन धीरला एलबीडब्ल्यू बाद करत इतिहास रचला. तो आयपीएलच्या पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. बोल्टने आयपीएलच्या पहिल्याच षटकात आतापर्यंत २६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने हा पराक्रम अवघ्या ८० डावात केला आहे. याआधी भुवनेश्वर कुमारने आयपीएलच्या पहिल्याच षटकात २५ विकेट घेतल्या होत्या. त्याने ११६ डावात ही कामगिरी केली होती.