मुंबई : मुंबई इंडियन्सने अवघ्या १५.३ षटकांत आरसीबीवर ७ विकेट्सने मोठा विजय नोंदवला आहे. आरसीबीने दिलेल्या १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इशान किशन, रोहित शर्मा आणि विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने हा शानदार विजय मिळवला आहे. सूर्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ताबडबोड फलंदाजी करत अवघ्या १९ चेंडूत ५२ धावा केल्या. मुंबईच्या फलंदाजीची सुरूवात खूपच चांगली झाली आणि इशान किशनने चौकार-षटकारांच्या आतिषबाजीसह मुंबईच्या विजयाचा पाया रचला. तर गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स घेत आरसीबीला लागोपाठ धक्के दिले.
इशान किशनने सलामीला येत दुसऱ्याच षटकात षटकार लगावत फटकेबाजीला सुरूवात केली आणि नंतर वादळी खेळी केली. इशानने ३४ चेंडूत ५ षटकार आणि ७ चौकारांसह ६९ धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माने संधी मिळताच फटके लगावले. रोहितने २४ चेंडूत ३ षटकार आणि ३ चौकारांच्या जोरावर ३८ धावा केल्या. इशान बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्याने वानखेडेवरील प्रेक्षकांसाठी चौकार-षटकारांसाठी खास आतिषबाजी केली. ३ महिन्यांनंतर आलेल्या सूर्याने आपला फॉर्म दाखवून देत अवघ्या १९ चेंडूच ४ षटकार आणि ५ चौकारांसह ५२ धावा केल्या. यानंतर हार्दिकनेही शानदार खेळी करत ६ चेंडूत ३ षटकारांसह २१ धावा केल्या आणि विजयी षटकाराने संघाला विजय मिळवून दिला.
आरसीबीने आयपीएलमधील सलग चौथा पराभव नोंदवला आहे. पुन्हा एकदा संघांच्या गोलंदाजांनी निराश केले आहे. १० षटके आणि १०० धावांचा टप्पा मुंबईने गाठल्यानंतर संघाला पहिली विकेट मिळवण्यात यश आले. पॉवरप्लेमध्ये इशानने सर्वच गोलंदाजांची धुलाई केली. सिराजही आजच्या सामन्यात एकही विकेट घेऊ शकला नाही. आकाशदीप, विजयकुमार आणि विल जॅक्स यांना प्रत्येकी एक विकेट मिळवता आली. पण तोवर सामना संघाच्या हातातून निसटला होता. प्रत्येक गोलंदाजाचा इकोनॉमी रेट हा या सामन्यात १० च्या वर होती.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने चांगली सुरुवात केली. मुंबईचा दमदार गोलंदाज बुमराहने तिसऱ्या षटकात विराट कोहलीला इशान किशनकरवी विकेटच्या मागे झेलबाद केले. विराट कोहली अवघ्या ३ धावांवर बाद झाला. यानंतर विल जॅकने ८ धावांवर विकेट गमावली. त्यानंतर आलेल्या रजत पाटीदारने शानदार खेळी करत संघाचा डाव सावरला. त्याने २६ चेंडूत ५० धावा केल्या.
दुसऱ्या टोकाला असलेल्या कर्णधार फाफ डू प्लेसिसने ४१ चेंडूत ६१ धावा करत संयमी फलंदाजी केली. मात्र, ग्लेन ग्लेन मॅक्सवेलने पुन्हा एकदा निराश केले आणि तो खाते न उघडताच बाद झाला. मॅक्सवेलला श्रेयस गोपालने एलबीडब्ल्यू केले. यानंतर आलेल्या फलंदाजांना बुमराहने माघारी धाडले. पण २३ चेंडूत ५३ धावांची नाबाद खेळी करत कार्तिकने संघाची धावसंख्या १९६ धावांवर नेली. कार्तिकने आपल्या खेळीत ५ चौकार आणि ४ शानदार षटकार मारले. मुंबईकडून बुमराहने ५, कोएत्झी,आकाश मधवाल आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.