Friday , November 22 2024
Breaking News

दिल्लीचा आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, घरच्या मैदानावर गुजरातचा ६ विकेट्सनी उडवला धुव्वा

Spread the love

 

अहमदाबाद : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ३२वा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने होते. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सवर ६ विकेट्सनी एकहाती विजय मिळवला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करायला उतरलेला गुजरातचा संघ दिल्लीच्या गोलंदाजांसमोर फलंदाजी करताना हतबल दिसला. ज्यामुळे गुजरात टायटन्सचा संघ १७.३ षटकांत ८९ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने ८.५ षटकांत ४ बाद ९२ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केला. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सने चेंडूच्या बाबतीत आयपीएलमधील सर्वात मोठा विजय नोंदवला.

लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली. पृथ्वी शॉ आणि जॅक फ्रेझर-मॅकगर्क यांच्यात पहिल्या विकेटसाठी २५ धावांची भागीदारी झाली. स्पेन्सर जॉन्सनने संघाला पहिला धक्का दिला. त्यांनी मॅकगर्कची शिकार केली. त्याला दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २० धावा करता आल्या. तर शॉ केवळ सात धावा करू शकला. या सामन्यात अभिषेक पोरेलने १५, शाई होपने १९, ऋषभ पंतने १६ आणि सुमित कुमारने ९ धावा केल्या. पंत आणि सुमित नाबाद राहिले. गुजरातकडून संदीप वारियरने दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर स्पेन्सर जॉन्सन आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्पूर्वी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला गुजरातचा संघ दिल्लीच्या गोलंदाजांपुढे १७.३ षटकांत ८९ धावांवर गारद झाला. गुजरात टायटन्सच्या डावात ८ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. साई सुदर्शनने १२ आणि राहुल तेवतियाने १० धावांचे योगदान दिले. १५ व्या षटकापर्यंत गुजरात टायटन्सची धावसंख्या ८ गड्यांच्या मोबदल्यात ७८ धावा होती. पण राशिद खान भक्कम भिंतीसारखा क्रीजवर उभा राहिला. मात्र, तो पण ३१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. गुजरातच्या डावात षटकार ठोकणारा राशिदद खान हा एकमेव फलंदाज होता. संथ खेळपट्टीवर झुंजत असताना, गुजरात टायटन्सचा डाव १८व्या षटकातच संपुष्टात आला, जेव्हा नूर अहमदला मुकेश कुमारने क्लीन बोल्ड केले.

दिल्लीच्या गोलंदाजी समोर गुजरातचे फलंदाज हतबल
आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची खूप धुलाई झाली होती, परंतु जीटी विरुद्धच्या सामन्यात प्रत्येकाने शानदार कामगिरी केली. मुकेश कुमारने ३, इशांत शर्मा आणि ट्रिस्टन स्टब्सने २, तर खलील अहमद आणि अक्षर पटेल यांनी आपापल्या षटकात प्रत्येकी एक विकेट घेतली. कुलदीप यादवला एकही विकेट घेता आली नसली, तरी त्याने ४ षटकांत केवळ १६ धावा देऊन गुजरातच्या फलंदाजांना सतत दबावाखाली ठेवले. या तगड्या गोलंदाजीमुळे त्याने गुजरातला पूर्ण २० षटकेही खेळू दिली नाहीत.

About Belgaum Varta

Check Also

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड

Spread the love  नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *