मुंबई : पाच वेळेचा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने आपल्या शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर 5 विकेटस्नी विजय मिळवून आयपीएल 2022 चा शेवट गोड गेला. या सामन्यात पराभूत झाल्यामुळे दिल्लीचे प्ले ऑफ फेरीत पोहोचण्याचे त्यांचे स्वप्न भंग पावले. मुंबईचे आव्हान या आधीच संपुष्टात आले असले तरी त्यांच्या विजयाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ प्ले ऑफ फेरीतील चौथा संघ म्हणून पात्र ठरला. प्रथम फलंदाजी करणार्या दिल्लीने 7 बाद 159 धावा केल्या. हे आव्हान मुंबईने 5 विकेटस् व 5 चेंडू राखून पूर्ण केले.
दिल्लीच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने सफशेल निराशा केली. तब्बल 13 चेंडू खेळून फक्त दोन धावा करून तो बाद झाला. पण, यानंतर ईशान किशन आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी फटकेबाजी केली. दोघांनी 35 धावांत अर्धशतकी भागीदारी केली. ईशान किशनही अर्धशतकाजवळ पोहोचला होता, पण कुलदीपने त्याला जाळ्यात अडकवला. षटकार मारताना सीमारेषेवर वॉर्नरने त्याचा झेल घेतला. ईशानने 35 चेंडूंत 48 धावा केल्या. यात तीन चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. यानंतर लगेच ब्रेविसला आश्चर्यकारक जीवदान मिळाले. त्याचा एक उत्तुंग झेल यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या ग्लोव्हज्मधून सुटला. हे जीवदान दिल्लीला महागात पडणार असे वाटत असताना शार्दूल ठाकूरने ब्रेविसचा त्रिफळा उडवला. तीन षटकार ठोकणार्या ब्रेविसने 37 धावा केल्या.
यानंतर तिलक वर्मा आणि टीम डेव्हिड यांनी दिल्लीकर गोलंदाजांची धुलाई सुरू केली. दोघांनी 21 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी करीत विजयाकडे वाटचाल केली; परंतु शार्दूलने टीम डेव्हिडला बाद करून दिल्लीच्या आशा जागवल्या. त्याने फक्त 11 चेंडूंत 34 धावा केल्या. यापाठोपाठ तिलक वर्मा (21) बाद झाला; परंतु रमणदीपसिंगने सामना जिंकून दिला.
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीचे डेव्हिड वॉर्नर (5) व मिचेल मार्श (0) हे हुकमी एक्के 22 धावांवर माघारी परतले. डॅनियल सॅम्स व जसप्रीत बुमराह यांनी या विकेट घेतल्या. सहाव्या षटकात बुमराहने दिल्लीला आणखी मोठा धक्का दिला. दिल्लीचा तिसरा फलंदाज 31 धावांवर माघारी परतला. पृथ्वीने 24 धावा केल्या. सर्फराज खान मयंक मार्कंडेच्या फिरकीवर तो 10 धावांवर बाद झाला. दिल्लीला 50 धावांवर चौथा धक्का बसला.
शौकिन व मयंक या फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी करताना दिल्लीवर सातत्याने दडपण निर्माण करण्यात यश मिळवले होते. पण रोव्हमन व ऋषभ यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून दिल्लीच्या डावाला आकार दिला; परंतु बाहेर जाणार्या चेंडूला छेडणे त्याला महागात पडले. ऋषभ 39 धावांवर बाद झाल्याने रोव्हमनसोबत त्याची 44 चेंडूंत 75 धावांची भागीदारीही संपुष्टात आली. 19 व्या षटकात बुमराहने भन्नाट यॉर्कर टाकला आणि रोव्हमनचा त्रिफळा उडवला. रोव्हमनने 34 चेंडूंत 1 चौकार व 4 षटकारांसह 43 धावा केल्या.
Check Also
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
Spread the love इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंड …