Friday , November 22 2024
Breaking News

१२ वर्षानंतर कोलकाताने मुंबईचा गड भेदला, वानखेडेच्या मैदानात पलटनचा २४ धावांनी पराभव

Spread the love

 

मुंबई : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ५१वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आले होते. ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सवर २४ धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. कोलकाताने २०१३ नंतर प्रथमच वानखेडेवर मुंबईला पराभूत केले आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने व्यंकटेश अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर सर्वबाद १६९ धावा केल्या होत्या. मात्र, प्रत्युत्तरात मुंबईचा संघ १८.५ षटकांत १४५ धावांवर गारद झाला. कोलकातासाठी मिचेल स्टार्कने ४ विकेट्स घेत विजयात महत्त्वाची भूमिका निभावली.

आंद्रे रसेल ठरला गेम चेंजर
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने ४६ धावांत ३ विकेट्स गमावल्या होत्या. रोहित शर्मा ११ धावा, इशान किशन १३ आणि नमन धीर ११ धावाच करू शकला. सूर्यकुमार यादव खंबीरपणे उभा राहिला, पण दुसऱ्या टोकाकडून सातत्याने विकेट पडत होत्या. सूर्यकुमार यादवने ३५ चेंडूत ५६ धावा केल्या, त्यादरम्यान त्याने ६ चौकार आणि २ षटकारही लगावले. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. मुंबईच्या इतर कोणत्याच गोलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही. त्याचबरोबर आता मुंबईच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा आशा संपुष्टात आल्या. वास्तविक, सामन्याचा गेम चेंजर आंद्रे रसेल ठरला, ज्याने सूर्यकुमार यादवची विकेट घेत सामना केकेआरकडे वळवला, त्याशिवाय त्याने हार्दिक पांड्याची विकेटही घेतली. त्याचबरोबर सुनील नरेन (२), वरुण चक्रवर्ती (२) आणि मिचेल स्टार्कने (४) शानदार गोलंदाजी केली.

तत्पूर्वी नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेला कोलकाता नाईट रायडर्स संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध संघर्ष करताना दिसला. ५७ धावांवर संघाने पाच विकेट गमावल्या. मुंबईच्या गोलंदाजीसमोर सॉल्ट-नरीनसारखे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. या सामन्यात सॉल्टने पाच धावा, रघुवंशीने १३ धावा, श्रेयस अय्यरने सहा धावा, सुनील नरेनने आठ धावा आणि रिंकू सिंगने नऊ धावा केल्या. यानंतर मयंक पांडे आणि व्यंकटेश अय्यर यांनी मोर्चा सांभाळला. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी ६२ चेंडूत ८३ धावांची भागीदारी झाली. प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या पांडेला हार्दिकने बाद केले. तो ४२ धावा करून परतला. कोलकाताला १७ व्या षटकात दोन धक्के बसले. या षटकात आंद्रे रसेलला केवळ सात धावा करता आल्या.

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची शानदार कामगिरी
या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. जसप्रीत बुमराहने तीन विकेट घेतल्या. वानखेडे स्टेडियमवर त्याने ५० विकेट पूर्ण केल्या. त्याने रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क आणि व्यंकटेश अय्यर यांना बाद केले. अय्यरने मुंबईविरुद्ध ७० धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सहा चौकार आणि तीन षटकार आले. त्यामुळे कोलकाता संघाला १९.५ षटकात सर्वबाद १६९ धावा करता आल्या. मुंबईसाठी नुवान तुषाराने तीन, कर्णधार पंड्याने दोन आणि पियुष चावलाने एक विकेट घेतली. कोलकाता संघ १९.५ षटकात १६९ धावांवर गारद झाला.

About Belgaum Varta

Check Also

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड

Spread the love  नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *