रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल २०२४ मधील ६२वा सामना पार पडला. एम. चिन्नास्वामी स्टेडियम खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीने ४७ धावांनी सलग पाचवा विजय मिळवत आपल्या प्लेऑफ्सच्या आशा कायम ठेवल्या. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने रजत पाटीदारच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर १८७ धावा केल्या होत्या. त्यानंतर आपल्या धावांचा बचाव करताना उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि दमदार गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सला १४० धावांवर रोखत विजयावर शिक्कामोर्तब केला.
आरसीबीने दिलेल्या १८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने ३० धावांत ४ विकेट्स गमावल्या होत्या. असे असतानाही संघाने पॉवरप्ले षटकांत ४ गडी गमावून ५० धावांचा टप्पा पार केला. अशा स्थितीत होप आणि अक्षर पटेल यांच्यात ५६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. पण १०व्या षटकात लॉकी फर्ग्युसनने होपला २९ धावांवर बाद केले. यानंतर ११व्या षटकात केवळ ३ धावा काढून ट्रिस्टन स्टब्स बाद झाल्याने दिल्लीचा संघ अडचणीत आला. आता संघाकडे एकही फलंदाज उरला नव्हता. अक्षर पटेल एका टोकाकडून गड लढवत होता, तर दुसऱ्या बाजूने विकेट पडत होत्या. पंधराव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रसिख दार सलाम १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
अक्षर पटेलची अर्धशतकी खेळी ठरली व्यर्थ
दिल्लीला विजयासाठी शेवटच्या ५ षटकात ६१ धावा करायच्या होत्या. १६व्या षटकात यश दयालने अक्षर पटेलला ५७ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले, त्यामुळे बंगळुरूचा विजय जवळपास निश्चित झाला होता. दिल्लीने १८ षटकापर्यंत १३५ धावा केल्या होत्या, पण फक्त एक विकेट शिल्लक होती. शेवटच्या षटकात ४८ धावा करणे अशक्य होते. यानंतर दिल्लीचा संघ १४० धावांवर ऑलआऊट झाला, त्यामुळे आरसीबीने हा सामना ४७ धावांनी जिंकला.
बंगळुरूसाठी हा सामना करा किंवा मरा असा होता
तत्पूर्वा नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकांत ९ गडी गमावून १८७ धावा केल्या होत्या. बंगळुरूसाठी, कॅमेरून ग्रीनने २४ चेंडूत ३२ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. तर रजत पाटीदारने ५२ धावांची तर विल जॅकने ४१ धावांची खेळी साकारली. दिल्लीकडून खलील अहमद आणि रसिख दार सलाम यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर इशांत शर्मा, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
आरसीबीच्या प्लेऑफ्सच्या आशा कायम
आरसीबीचे १३ सामन्यांत सहा विजय आणि सात पराभवांसह त्यांचे १२ गुण आहेत. दिल्लीवरील विजयासह संघ पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. बेंगळुरूला शेवटचा सामना १८ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध चिन्नास्वामी येथे खेळायचा आहे. या सामन्यावर दोन्ही संघांचे भवितव्य अवलंबून असेल. चेन्नई जिंकल्यास आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. त्याचवेळी, आरसीबी जिंकल्यास त्याला चांगल्या फरकाने जिंकावे लागेल, जेणेकरून नेट रन रेट चेन्नईपेक्षा चांगले होऊ शकेल. यानंतरही बंगळुरूला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta