खानापूर : रामनगर येथील पांढरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार दिनांक 12 रोजी सायंकाळी घडली. हुबळी येथील मेहबूब मुबारक पठाण (वय 11) आणि चर्च गल्ली रामनगर येथील आफण असफाक खान (वय 12) अशी बुडून मरण पावलेल्या मुलांची नावे आहेत.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, मेहबूब हा आपल्या नातेवाईकांच्या घरी आला होता. मेहबूब आणि आफण हे रविवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान रामनगर येथील पांढरी नदीत, नार्वेकर ब्रिजच्या बाजूला पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोन्ही मृतदेह रामनगर पोलिसांनी नदीतून बाहेर काढले असून याप्रकरणी रामनगर पोलीस स्थानकात गुन्ह्यांची नोंद झाली आहे. घटनास्थळी सीपीआय चंद्रशेखर हरिहर, डीवायएसपी शिवानंद यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. रामनगर पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक बसवराज एन एम यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.