भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयाची नोंद करून सुपर ८ मध्ये एन्ट्री मारली. अमेरिकेच्या १११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक झाली, परंतु भारताने विजय मिळवला. विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या अपयशानंतर रिषभ पंत, सूर्यकुमार यादव व शिबम दुबे यांनी उल्लेखनीय कामगिरी करून अमेरिकेला पराभूत केले. सूर्यकुमारचा झेल सोडणे अमेरिकेला महागात पडले. सूर्यकुमार व शिवम यांनी केलेली ६७ धावांची भागीदारी निर्णायक ठरली.
विराट कोहली (०) व रोहित शर्मा (३) यांना सौरभ नेत्रावळकरने माघारी पाठवले. सूर्यकुमार यादव व रिषभ पंत यांनी काहीकाळ खिंड लढवली, परंतु अली खानने अप्रतिम चेंडूवर रिषभचा (१८) त्रिफळा उडवला. गोलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीचा वापर अमेरिका चांगल्यारितीने करून घेत होती आणि त्यामुळे शिबम दुबे दडपणाखाली खेळताना दिसला. तो दोनवेळा रन आऊट होता होता वाचला. सूर्यकुमारनही अमेरिकन गोलंदाजांचा मारा पाहून हडबडला. सूर्याचा २२ धावांवर असताना सौरभकडून झेल सुटला आणि भारतीय फलंदाजाच्या पत्नीने देवाचे आभार मानले. ही कॅच सोडून अमेरिकेनं खरं तर मॅच गमावली. सूर्याने त्यानंतर फटकेबाजी सुरू केली. ३० चेंडूंत ३५ धावा भारताला विजयासाठी हव्या होत्या. १६ वे षटक पूर्ण करण्यासाठी अमेरिकेने अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेतला आणि त्यामुळे भारताला ५ पेनल्टी धावा मिळाल्या. त्यामुळे अंतर ३० चेंडू ३० धावा असे झाले. सूर्या व शिवम यांनी चौथ्या विकेटसाठी संयमी पण महत्त्वाची अर्धशतकी भागीदारी करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. सूर्याने ४९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. भारताने १८.२ षटकांत ३ बाद १११ धावा करून ७ विकेट्स राखून विजय मिळवला. सलग तिसऱ्या विजयासह भारत सुपर ८ मध्ये पोहोचला. सूर्या ४९ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ५० धावांवर, तर शिवम ३५ चेंडूंत १ चौकार व १ षटकारांसह ३१ धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, अर्शदीप सिंगने ४ षटकांत ९ धावांत ४ विकेट्स घेऊन विश्वविक्रमी कामगिरी केली. त्याच्या भेदक माऱ्यासमोर अमेरिकेला ८ बाद ११० धावा करता आल्या. हार्दिक पांड्या (४-१-१४-२), अक्षर पटेल (१-२५) यांच्यासह भारताच्या अन्य गोलंदाजांनी चांगला मारा केला. अमेरिकेसाठी स्टीव्हन टेलर (२४), नितीश कुमार (२७), कोरी अँडरसन (१५), आरोन जोन्स (११) व शादली व्हॅन (११) यांनी चांगले योगदान दिले.