अँटिग्वाच्या मैदानावर आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील ४७ वा सामना पार पडला. या सामन्यात भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करताना हार्दिक पंड्याच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने ५ गडी बाद १९६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला १४६ धावा करता आल्या. यासह भारतीय संघाने या सामन्यात ५० धावांनी विजय मिळवला आहे.
बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी १९६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने शानदार सुरुवात केली होती. लिटन दासने १३ आणि तंजिद हसनने २९ धावा केल्या. मात्र हार्दिक पंड्याने ही जोडी फोडली. त्यानंतर कुलदीपने हसनला बाद करत माघारी धाडलं. कर्णधार नजमुल शांतोने संघाचा डाव पुढे नेला. मात्र तो देखील ४० धावा करत तंबूत परतला. बांगलादेश या सामन्यात १४६ धावा करता आल्या.
भारतीय संघाने केल्या १९६ धावा
या सामन्यात बांगलादेशच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि विराट कोहलीची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आली होती. दोघांनी संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. रोहित शर्माची मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकुच सुरु होती. मात्र शाकिब अल हसनने त्याला २३ धावांवर बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर विराट आणि रिषभ पंतने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. विराटने २८ चेंडूंचा सामना करत १ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३७ धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने २४ चेंडूंचा सामना करत ४ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ३६ धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या चमकला.
हार्दिक- दुबेची तुफान फटकेबाजी
विराट-रिषभ बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला. त्याने पहिल्याच चेंडूवर लेग साईडच्या दिशेने षटकार मारला. मात्र पुढच्याच चेडूंवर तो बाद होऊन माघारी परतला. शेवटी शिवम दुबे आणि हार्दिक पंड्याने बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली. दुबेने २४ चेंडूंचा सामना करत ३ षटकारांच्या सहाय्याने ३४ धावांची खेळी केली. तर हार्दिक पंड्याने २७ चेंडूंचा सामना करत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ५० धावा केल्या. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने १९६ धावांचा डोंगर उभारला.