त्रिनिदाद : टी – ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत बलाढ्य संघांना धुळ चारत उपांत्य फेरी गाठलेल्या अफगाणिस्तान संघाला उपांत्य फेरीत पराभव स्विकारावा लागला. आज दक्षिण- आफ्रिका आणि अफगाणिस्तानमध्ये लढत झाली. या सामन्यात अफगाणिस्तान संघाचा ९ गडी राखून दारुण पराभव झाला. या विजयासोबतच दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्यांदाच टी- ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एन्ट्री केली आहे.
टी – ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर आज अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी लढत झाली. संपूर्ण स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या अफगाणिस्तान संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र दक्षिण आफ्रिकेने पहिल्या चेंडूपासून सामन्यावर पकड मिळवत एकतर्फी विजय मिळवला.
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी पूर्णपणे चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानचा संघ ११.५ षटकांत केवळ ५६ धावांवर सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यानसेन आणि तबरेझ शम्सी यांनी भेदक मारा करत प्रत्येकी ३ बळी घेतले. त्यानंतर ८.५ षटकांत १ गडी गमावत ६० धावा करून दणदणीत विजय मिळवला अन् दिमाखात अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला.