नवी दिल्ली : भारतीय संघाने आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ अखेर संपवला आहे. आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात फलंदाजांची दमदार कामगिरी आणि गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी १७७ धावा करायच्या होत्या. या धावांचा बचाव करताना भारतीय संघाने ७ धावांनी बाजी मारली.
दक्षिण आफ्रिकेकडून धावांचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉकने आक्रमक सुरुवात केली. त्याने ३१ चेंडूंचा सामना करत ३९ धावांची खेळी केली. तर रिजा हेंड्रिक्स ४ आणि कर्णधार एडेन मार्करम ४ धावा करत माघारी परतला. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्सने ३१ धावांचं योगदान दिलं. शेवटी हेनरिक क्लासेनने २७ चेंडूत ५२ धावा केल्या.
भारतीय संघाने केल्या १७६ धावा
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि अक्षर पटेल या दोघांनी महत्त्वपूर्ण भागीदारी केले आणि भारतीय संघाचे धावसंख्या 176 धावांवर पोहोचवली. सामन्याच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला दुहेरी धक्का बसला. केशव महाराजने रोहित शर्मा आणि रिषभ पंतला बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर अक्षर पटेल आणि विराट कोहलीने ७२ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मा ९, विराट कोहली ७६, रिषभ पंत ०, सूर्यकुमार यादव ३, अक्षर पटेल ४७ आणि शिवम दुबे २७ धावा करत माघारी परतला.