Thursday , September 19 2024
Breaking News

भारताचा श्रीलंकेवर दमदार मालिका विजय; दुसऱ्या सामन्यात ७ गडी राखून विजय

Spread the love

 

कोलंबो : पल्लेकेले येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात डकवर्थ-लुईस नियमानुसार ७ गडी राखून विजय मिळवला. नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने पहिलीच मालिका जिंकली आहे. गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव या जोडीची संस्मरणीय सुरुवात झाली आहे. हा सामना जिंकून भारताने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली.

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने २० षटकात ९ विकेट गमावत १६१ धावा केल्या. यानंतर पावसाने व्यत्यय आणल्यामुळे भारताला विजयासाठी ८ षटकांत ७८ धावांचे लक्ष्य मिळाले. जे टीम इंडियाने ६.३ षटकात ३ विकेट्स गमावत ८१ धावा करत सामना जिंकला.

टी-२० मध्ये भारताचा दबदबा कायम

भारत सलग ६ द्विपक्षीय मालिकेत अपराजित आहे. २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका गमावली होती. त्यानंतर टीम इंडियाने आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियाला टी-२० मालिकेत पराभूत केले. दक्षिण आफ्रिकेसोबतची मालिका बरोबरीत सुटली. त्यानंतर संघाने अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वेचा पराभव केला. याच काळात भारताने अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकातही एकाही सामन्यात पराभव न पत्करता आयसीसीचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवला.

संजू सॅमसन दुसऱ्याच षटकात क्लीन बोल्ड
भारताकडून यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार आणि हार्दिक पंड्या यांनी झटपट धावा केल्या. तिघांनी मिळून टीम इंडियाचा विजय निश्चित केला. यासामन्यात दुखापतग्रस्त शुबमन गिलच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आली होती, मात्र तो आपले खातेही उघडू शकला नाही. तो दुसऱ्याच षटकात क्लीन बोल्ड झाला. त्याच्यानंतर सूर्याने यशस्वीला फलंदाजीसाठी साथ दिली.

हार्दिक पंड्याने ठोकला विजयी चौकार
या दोघांनी मिळून संघाला ५० धावांच्या पुढे नेले. पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सूर्या मथिशा पाथिरानाचा बळी ठरला. दासुन शनाकाने त्याचा झेल घेतला. सहाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर यशस्वी पॅव्हेलियनमध्ये परतला. वानिंदू हसरंगाने त्याला शनाकाकडे झेलबाद केले. यशस्वीने १५ चेंडूत ३० धावा केल्या. त्याने ३ चौकार आणि २ षटकार मारले. हार्दिकने ९ चेंडूत २२ आणि ऋषभ पंतने २ चेंडूत २ धावा करत सामना संपवला. पाथीरानाच्या चेंडूवर हार्दिकने विजयी चौकार ठोकला.

श्रीलंकेची १५व्या षटकापर्यंत दमदार फटकेबाजी
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. त्याने ९.३ षटकात २ गडी बाद ८० धावा केल्या होत्या. पथुम निसांका ३२ धावा करून बाद झाला तर कुशल मेंडिस १० धावा करून बाद झाला. येथून कुशल परेरा आणि कामिंदू मेंडिस यांनी डावाची धुरा सांभाळत संघाला १५ षटकांत २ बाद १३० धावांपर्यंत नेले. येथून लंकेचा संघ २०० धावांच्या जवळ पोहोचेल असे वाटत होते. भारतीय गोलंदाजांनी १६व्या षटकात जोरदार पुनरागमन केले. हार्दिक पंड्याने त्याच षटकात कामिंदू मेंडिस आणि कुशल परेराला बाद केले. मेंडिस २६ धावा करून बाद झाला तर परेरा ५३ धावा करून बाद झाला.

रवी बिश्नोईने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या
पुढच्याच षटकात रवी बिश्नोईने सलग दोन चेंडूंवर दासून शनाका आणि वानिंदू हसरंगा यांना क्लीन बोल्ड केले. दोन्ही फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. अर्शदीपने १९व्या षटकात कर्णधार चारिथ असलंकाला (१४ धावा) बाद केले. अखेरच्या षटकात अक्षर पटेलने महिष तिक्षीना (२) आणि रमेश मेंडिस (१२) यांना बाद केले. भारताकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक ३ बळी घेतले. हार्दिक, अर्शदीप आणि अक्षर यांना प्रत्येकी २ यश मिळाले.

About Belgaum Varta

Check Also

विनेश फोगटची रौप्य पदक मागणीची याचिका क्रीडा लवादाने फेटाळली

Spread the love  नवी दिल्ली : भारताची पैलवान विनेश फोगाट हिला मोठा धक्का बसला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *