
अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ३५६ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा डाव २१४ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना १४२ धावांनी जिंकून मालिका ३-० ने खिशात घातली आहे.
फलंदाजीत हिट ठरल्यानंतर भारतीय गोलंदाजही चमकले. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सलामीला फलंदाजी करताना, शुभमन गिलने सर्वाधिक ११२ धावांची खेळी केली.
त्यानंतर श्रेयस अय्यरने ७८ धावांची खेळी केली. गेल्या काही महिन्यांपासून फलंदाजीत संघर्ष करत असलेला विराट कोहली या डावात चमकला. त्याने ५२ धावांची खेळी केली. शेवटी केएल राहुलने ४० धावांची खेळी करत भारतीय संघाची धावसंख्या ३५६ धावांवर पोहोचवली.
भारतीय गोलंदाजही चमकले…
पहिल्या डावात भारतीय फलंदाजांचा हल्लाबोल पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांची हवा पाहायला मिळाली. डोंगराइतक्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंड संघातील एकाही फलंदाजाला ५० धावांचा आकडा देखील पार करता आला नाही.
इंग्लंडकडून फिल सॉल्टने २३, बेन डकेटने ३४, टॉम बेंटमने ३८ आणि जो रुटने २४ धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादवने प्रत्येकी १-१ गडी बाद केले.

Belgaum Varta Belgaum Varta