Saturday , April 26 2025
Breaking News

फासेपारध्यांच्या आंतरराज्य दरोडेखोर टोळीला कागलजवळ अटक

Spread the love

 

निपाणी पोलिसांची कारवाई : कोगनोळीतील दरोड्याचा उलगडा; ८ तोळे सोन्यासह १० लाखांचा मुद्देमाल; म्होरक्या फरार
निपाणी : विविध चोरीच्या गुन्ह्यात कर्नाटक, महाराष्ट्र या दोन राज्यासह चार जिल्ह्यातील पोलिसांसाठी वाॅण्टेड असलेल्या आंतरराज्य फासेपारधी दरोडेखोर टोळीतील तिघांना निपाणी ग्रामीण पोलिसांनी बुधवारी अटक केली. दरम्यान या टोळीकडून ८ जानेवारी २०२३ रोजी कोगनोळी येथे झालेल्या माजी शिक्षणाधिकाऱ्यांच्या घरातील दरोडा प्रकरणाचा उलगडा या टोळीकडून झाला असून अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये दोघा सख्ख्या भावांचा समावेश आहे. या तिघांकडून ८ तोळे सोन्याचे, १४ किलो चांदीचे दागिने, १ दुचाकी असा १० लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून टोळीचा म्होरक्या सोन्याच्या दागिन्याची बॅग घेऊन पसार झाला आहे. या आंतरराज्य टोळीला अटक करण्यात आल्याने जिल्हा पो.प्रमुख डॉ.भीमाशंकर गुळेद यांनी निपाणी ग्रामीण पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

अर्जुन उर्फ अर्जंट नबीब भोसले (वय ४५ ) रा.चाबूसरवाडी ता.मिरज जि. सांगली, याराना दिलीप काळे (वय ३०) व त्याचा भाऊ नमन उर्फ जयवंत दिलीप काळे (वय २४) रा.धुळगाव ता.तासगाव जि.सांगली अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. यात टोळीचा म्होरक्या गोदरेज लख्खाप्पा पोवार (रा.आरग) ता.मिरज जि.सांगली हा चोरीतील लुटलेल्या सुमारे १० किलो सोन्याच्या दागिन्याची बॅग घेऊन पसार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध जारी ठेवला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, निपाणी ग्रामीण पोलीसांची महामार्गावर गस्त सुरू असताना जिल्हा पोलिस मुख्यालयातून आलेल्या संदेशाच्या आधारे चिकोडीचे डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी.एस. तळवार, उपनिरीक्षक शिवराज नाईकवडी यांनी एलसीबी पथकाचे हावलदार एम.एफ. नदाफ, संजय काडगौडर, रघु मेलगडे, अमर चंदनशिवे, यासिन कलावंत, राजू दिवटे, के.डी. हिरेमठ, शेखर असोदे, गोपाळ बडीगेर, तोफिक मुजावर, प्रभू सिद्धाठगीमठ आदींनी महामार्गावर तवंदी घाट ते कोगनोळी टोलनाका या टापूत महामार्गावर सापळा रचला.

दरम्यान या टोळीने गुंगारा देत कर्नाटक सीमा करून महाराष्ट्रात प्रवेश केला. यावेळी पोलीस पथकाने या टोळीचा पाठलाग करून कागल हद्दीतील लक्ष्मी टेकडीजवळ महामार्गावर या टोळीतील तिघांना ताब्यात घेतले. यावेळी काही अंतर पुढे असलेल्या या टोळीचा दुचाकीवरील म्होरक्या गोदरेज पोवार हा सोन्याने भरलेली बॅग घेऊन पसार झाला.

दरम्यान ताब्यातील तिघांची कसून चौकशी केली असता तिघांनीही आपण बेळगाव जिल्ह्यातील मुरगूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेनापुर, संकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील हेब्बाळ व हंचिनाळ येथील घरफोडीसह ८ जानेवारी २०२३ रोजी आपण कोगनोळी येथील निवृत्त शिक्षणाधिकारी सी.वाय. पाटील यांच्या घरावर दरोडा टाकून ३० तोळे सोने व रोख रक्कम लुटल्याची कबुली दिली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून निपाणी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांची हिंडलगा जेलमध्ये रवानगी केल्याची माहिती सीपीआय बी.एस. तळवार यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

चांद शिरदवाड येथे १४ पासून पंचकल्याण महोत्सवाचे आयोजन

Spread the love  डॉ. अविनाश पाटील; ७ दिवसात विविध कार्यक्रम निपाणी (वार्ता) : चांद शिरदवाड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *