Sunday , December 7 2025
Breaking News

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आज भारत-न्यूझीलंडची लढाई

Spread the love

 

 

दुबई : तगडे प्रतिस्पर्धी आणि टीकाकारांना दूर ठेवत अंतिम लढतीपर्यंतची वाटचाल करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला चॅम्पियन्स करंडक उंचवायचा झाल्यास आज, रविवारी होणाऱ्या जेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडचे आव्हान परतवून लावावे लागणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या संथ खेळपट्टीवर भारताला फिरकीचा अडथळाही पार करावा लागेल.

भारतीय संघाने २०१३ मध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धा अखेरची जिंकली होती. त्या संघातील रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा हे अनुभवी त्रिकूट अजूनही भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या तिघांचाही १२ वर्षांच्या कालावधीनंतर चॅम्पियन्स करंडक पुन्हा उंचावण्याचा मानस असेल.

‘आयसीसी’च्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंडने कायमच भारतासमोर आव्हान उभे केले आहे. अलीकडच्या काळात २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकाची उपांत्य लढत आणि २०२३च्या जागतिक अजिंक्यपद कसोटी (डब्ल्यूटीसी) स्पर्धेची अंतिम लढत यात न्यूझीलंडने भारतावर मात केली होती. ‘आयसीसी’ स्पर्धांच्या बाद फेरीत उभय संघांत आतापर्यंत चार सामने झाले असून यात तीन वेळा न्यूझीलंडने, तर केवळ एकदा भारताने विजय मिळवला आहे. त्यामुळे यंदा चॅम्पियन्स करंडकाच्या साखळी फेरीत भारताने न्यूझीलंडला पराभूत केले असले, तरी अंतिम लढतीत ‘किवी’ संघाला कमी लेखण्याची चूक भारत निश्चितपणे करणार नाही.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकताना ‘आयसीसी’ जेतेपदाची दशकभराहूनही अधिक काळापासूनची प्रतीक्षा संपवली होती. आता आपली दमदार कामगिरी सुरू ठेवत ‘आयसीसी’ची सलग दुसरी स्पर्धा जिंकण्याची भारताकडे संधी आहे. मात्र, त्यासाठी आपल्याला सर्वोत्तम खेळ करावा लागणार याची भारतीय संघाला निश्चित कल्पना आहे.

दुबईच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंचा दबदबा अपेक्षित आहे. भारताकडे रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती असे लयीत असलेले फिरकी गोलंदाज आहेत. त्याच वेळी न्यूझीलंडने चारपैकी तीन सामने पाकिस्तानात खेळल्याने त्यांच्या फिरकी गोलंदाजांना फारशी मदत मिळाली नाही. मात्र, लाहोर येथील फलंदाजांसाठी नंदनवन ठरत असलेल्या खेळपट्टीवर न्यूझीलंडचा कर्णधार आणि डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरने मधल्या षटकांत दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख तीन फलंदाजांना माघारी धाडले होते. त्यामुळे न्यूझीलंडला उपांत्य लढत जिंकता आली. आता अंतिम लढतीतही भारतीय फलंदाजांना सँटनरपासून सावध राहावे लागेल.

सूत्रांच्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान सामन्याची खेळपट्टी आता वापरण्यात येणार आहे. ही खेळपट्टी फिरकीला अनुकूल असणे अपेक्षित आहे. तसेच सामन्याच्या वेळी उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज आहे. त्यामुळे खेळाडूंची कसोटी लागेल.

About Belgaum Varta

Check Also

भारताने पाकिस्‍तानला लोळवले : एशिया चषकावर नाव कोरले

Spread the love  दुबई : दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कप २०२५ मधील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *