लंडन : इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी एकदिवसीय कर्णधार म्हणजे इयॉन मॉर्गन. पण हाच मॉर्गन मागील काही दिवसांपासून खास फॉर्ममध्ये नसून आता वयाच्या 35 व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इंग्लंडला एकमेव एकदिवसीय चषक जिंकवून देणारा कर्णधार इयॉन मॉर्गन याच्या निवृत्तीची माहिती आयसीसीने ट्वीट करत दिली आहे.
क्रिकेट जिथे सर्वात आधी सुरु झालं अशा देशाचा विचार केल्यास इंग्लंडचा नाव सर्वात आधी घेतलं जातं. पण असं असूनही क्रिकेट विश्वचषक सुरु होऊनही कित्येक वर्षे इंग्लंडला विश्वचषक जिंकता आला नाही. पण ही अद्भुत कामगिरी करुन दाखवली इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने 2019 साली. न्यूझीलंड संघाला अंतिम सामन्यात मात देत इंग्लंडने हा विश्वचषक जिंकला होता. पण मॉर्गन लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर आता त्याने निवृत्ती जाहीर केल्याची अधिकृत माहिती आयसीसीने दिली आहे.
मॉर्गनची क्रिकेट कारकिर्द
2006 साली आंतरराष्ट्रीय सामन्यांत पदार्पण करणाऱ्या मॉर्गनने 16 वर्षानंतर निवृत्ती स्वीकारली आहे. आधी 2006 ते 2009 आयर्लंडसाठी क्रिकेट खेळलेल्या मॉर्गनने पुढील सर्व वर्षे इंग्लंडसाठी क्रिकेट खेळला. 35 वर्षीय मॉर्गन मर्यादीत षटकांतील उत्तम कर्णधार असण्यासह इंग्लंडकडून धावा करण्यातही आघाडीवर होता. त्याने इंग्लंडकडून 225 एकदिवसीय सामन्यात 13 शतकांसह 6 हजार 957 धावा ठोकल्या. तर आयर्लंड आणि इंग्लंडकडून मिळून 7 हजार 701 धावा 14 शतकांसह केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने 126 सामन्यात इंग्लंडचं नेतृत्त्व करत 76 सामने संघाला जिंकवून दिले, त्यामुळे 5.25 हा त्याची सामने जिंकण्याची सरासरी ठरली. यामध्ये 2019 साली त्याने संघाला मिळवून दिलेला पहिला वहिला एकदिवसीय चषक खास ठरला.
याशिवाय मॉर्गन एक अत्यंत यशस्वी टी20 खेळाडू देखील आहे. त्याने 72 पैकी 42 सामन्यात संघाचा कर्णधार राहून विजय मिळवून दिला. तर 115 टी20 सामन्यात 136.18 च्या सरासरीने 2 हजार 458 धावा केल्या. यावेळी 14 अर्धशतकंही त्याने ठोकली होती.