बर्मिंगहम : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात बर्मिंगहम येथे पार पडलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 7 गडी राखून विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या 378 धावांचा पाठलाग करताना चौथ्या आणि पाचव्या दिवशी जॉनी बेअरस्टो आणि जो रुट जोडीने तुफान शतकं ठोकत इंग्लंडला विजय मिळवून दिला. मागील वर्षी सुरु झालेल्या मालिकेतील हा उर्वरीत पाचवा कसोटी सामना होता. मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर होता, ज्यामुळे हा सामना जिंकल्यास भारत मालिकाही जिंकला असता. पण इंग्लंडने सामना जिंकल्याने मालिकाही अनिर्णीत सुटली आहे.
सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने गोलंदाजी घेतली. ज्यानंतर भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली पण निम्मा संघ बाद झाला असताना ऋषभ पंतने 146 आणि रवींद्र जाडेजाने 104 धावा केल्यामुळे भारताने 416 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली, पण जॉनी बेअरस्टो (104) याचं शतक संघासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं. पण, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ 61.1 षटकांत 284 धावांत संपुष्टात आला. पहिल्या डावात भारताने 132 धावांची आघाडी घेतली. ज्यानंतर दुसरा डाव खेळायला आलेल्या भारताच्या फलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही. सर्वत फलंदाज स्वस्तात माघारी परतले. पण पुजारा आणि पंत यांची अर्धशतकं संघासाठी महत्त्वाच्या ठरली. यावेळी पंतने 86 चेंडूत 57 तर पुजाराने 168 चेंडूत 66 धावा केल्यामुळेच भारत 245 धावा करु शकला. ज्यामुळे आता इंग्लंडसमोर 378 धावांचे एक तगडे लक्ष्य भारताने ठेवले.
त्याचा पाठलाग करताना इंग्लंडकडून सलामीवीर ऍलेक्स आणि जॅक यांनी दमदार सुरुवात केली. पण ऍलेक्स 56 तर जॅक 46 धावा करुन बाद झाला. नंतर ओली शून्य धावांवर बाद झाला. बुमराहने ऑली आणि जॅकला बाद केलं. तर ऍलेक्स धावचीत झाला. त्यानंतर मात्र जो रुट आणि जॉनी यांनी तुफान फटकेबाजी केली. चौथ्या दिवशीच्या अखेरीस जो रुटने 112 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 78 धावा लगावल्या असून जॉनीने 87 चेंडूत 8 चौकारांसह एक षटकार ठोकत नाबाद 72 धावा केल्या. ज्यामुळे इंग्लंडचा स्कोर 259 वर तीन बाद होता आणि पाचवा संपूर्ण दिवस हातात असताना त्यांना 119 धावांची गरज विजयासाठी होती आणि हातातही 7 विकेट्स होत्या. ज्यानंतर खेळ सुरु होऊन पहिल्याच सेशनमध्ये जो आणि जॉनीने तुफान फटकेबाजी करत आपआपली शतकंही पूर्ण केली आणि संघाला एक तगडा विजयही मिळवून दिला.