साऊथम्टन : हिट मॅन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आता इंग्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज (गुरुवार) साऊथम्टनमधील रोझ बाऊल स्टेडियमवर रंगणार आहे. पाचव्या कसोटी सामन्यात स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड करण्याच्या निर्धाराने टीम इंडिया आज मैदानात उतरणार आहे. मात्र, यासाठी भारतीय संघाला सर्व आघाड्यार इंग्लंडपेक्षा सरस कामगिरी करावी लागणार आहे.
कोरोनामुळे गतसाली खेळविण्यात न आलेल्या व नुकत्याच झालेल्या पाचव्या कसोटीत इंग्लंडने विजय मिळवत मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडविली. कोरोना संसर्ग झाल्याने या कसोटी सामन्यात रोहित शर्मा खेळू शकला नव्हता. यामुळे संघाचे नेतृत्व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सांभाळले होते. पहिल्या टी-20 सामन्यात बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय कोहलीही संघात नसेल. ईशान किशन अथवा ऋतुराज गायकवाड यापैकी एका फलंदाजाला रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. तर विकेटकिपरची जबाबदारी दिनेश कार्तिक पार पाडणार आहे. ऋषभ पंतला पहिल्या टी-20 साठी विश्रांती देण्यात आली आहे.
यजमान इंग्लंडने रोझ बाऊलवर आतापर्यंत 9 सामने खेळताना 6 मिळविले आहेत. तर 3 सामन्यात पराभव पत्करला आहे. 5 भारताने रोझ बाऊलवर आजपर्यंत एकही टी 20 सामना खेळलेला नाही. मात्र, पाच एकदिवशीय सामने खेळताना 3 विजय मिळविले आहेत. तर दोन सामने गमावले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta