
बर्मिंगहॅम : भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडसमोर विजयासाठी 171 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र इंग्लंचा संपूर्ण संघ 121 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पोहचला. भारताने 49 धावांनी सामना जिंकत ज्या मैदानावर इंग्लंडने कसोटीत भारताला मात दिली होती त्याच एजबेस्टनमध्ये टी 20 सामन्यात भारताने इंग्लंडला मात देत मालिकेवर कब्जा केला.
भारताकडून भुवनेश्वर कुमारने भेदक मारा करत तीन विकेट घेतल्या. त्याने इंग्लंडच्या जेसन रॉयला इनिंगच्या पहिल्याच चेंडूवर बाद करत दमदार सुरूवात केली होती. त्याला भारताकडून जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत चांगली साथ दिली. इंग्लंडकडून मोईन अलीने 35 तर डेव्हिड विलीने 33 धावांचे योगदान दिले.
दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा याच्या ३१ धावा, ऋषभ पंत याच्या २७ धावा आणि अखेरच्या षटकात रवींद्र जडेजाने नाबाद राहत केलेल्या २९ चेंडूत ४६ धावांच्या फटकेबाजीच्या बळावर भारताने इंग्लंड समोर आठ गड्यांच्या मोबदल्यात १७१ धावांचे आव्हान ठेवले. दुसऱ्या टी २० सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर याने भारताला फलंदाजीचे निमंत्रण दिले. सलामीवीर रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांनी चांगली सुरुवात केली. पण, सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत ठराविक अंतरात बळी घेत राहिले. अखेर जडेजाने केलेल्या अखेरच्या षटकातील फटकेबाजीमुळे भारत एक आव्हानात्मक धावसंख्या उभा करु शकला.
इंग्लंडचे निमंत्रण स्विकारुन भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि रुषभ पंत यांनी पहिल्या चार षटकात इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरफूस समाचार घेतला. ताबडतोब फटकेबाजी करत रोहित शर्मा याने २० चेंडूत ३१ धावा केल्या. अखेर पाचव्या षटकातील पाचव्या चेंडूवर रिचर्ड ग्लेसन याने शर्माला बाद केले. या खेळीत रोहित शर्माने २ षटकार आणि तीन चौकार लगावले. रोहित नंतर आलेल्या विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला तो केवळ १ धाव करुन पुन्हा ग्लेसनची शिकार ठरला. पुढील चेंडूवर पुन्हा ग्लेसनने पंतला बाद केले. पंतने १५ चेंडूत २६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
भारताच्या पहिल्या तीन बळी नंतर मात्र इंग्लंडचे गोलंदाजांनी दबाव वाढवला व ठराविक अंतरावर ते भारताचे बळी घेत राहिले. पंत नंतर सुर्यकुमार यादव (११ चेंडूत १५), हार्दिक पंड्या (१५ चेंडूत १२), दिनेश कार्तिक (१७ चेंडूत १२), हर्षल पटेल (६ चेंडूत १३) व भुवनेश्वर कुमार (४ चेंडूत २) ठरावीक अंतरावर बाद होत राहिले. एका क्षणी भारताची अवस्था ५ बाद ८९ अशी बिकट झाली होती. अखेरच्या षटकांमध्ये अष्टपैलू रवींद्र जडेजाने तळातील फलंदाजांसोबत घेऊन आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. नाबाद खेळी करत जडेजाने २९ चेंडूत ४६ धावा केल्या.
इंग्लंडकडून गोलंदाज रिचर्ड ग्लेसन याने १५ धावा देत ३ बळी घेतले. तर ख्रिस जॉर्डन याने ४ बळी घेत भारताचा मध्यक्रमातील फळीच उध्वस्त केली. त्याने २७ धावा देत ४ बळी घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta