विम्बल्डन 2022 या टेनिस जगतातील मानाच्या स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला मात देत विजेतेपद मिळवलं आहे. सलग चौथ्यांदा नोवाकनं विम्बल्डनचं जेतेपद पटकावलं असून आता त्याच्याकडे 21 ग्रँड स्लॅम झाली आहेत. त्याने रॉजर फेडररला मागे टाकलं आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात नोवाकने 4-6, 6-3, 6-4, 7-6 (3) च्या फरकाने विजय मिळवला आहे. अटीतटीच्या सामन्यात अखेर टायब्रेकर झाल्यानंतर नोवाकने विजय मिळवत जेतेपद नावे केलं आहे.
जोकोविचने रचला इतिहास
जोकोविचनं मागील तीन वेळा सलग विम्बल्डन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. ज्यानंतर आता आज त्याने विजय मिळवत विम्बल्डन 2022 च्या स्पर्धेचंही जेतेपद पटकावत सलग चौथ्यांदा विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. शिवाय जोकोविचच्या नावावर 21 ग्रँड स्लॅम जिंकण्याची नोंद देखील झाली आहे. ज्यामुळे त्याने रॉजर फेडरर ज्याच्या नावावर 20 ग्रँड स्लॅम आहेत, त्याला मागे टाकलं आहे. या यादीत स्पेनचा राफेल नदाल 22 ग्रँड स्लॅमसह अव्वल स्थानी आहे.