सिंगापूर : टेनिस विश्वातील एक भव्य स्पर्धा असणाऱ्या सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल दर्जाची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने चीनच्या हान युईला मात देत थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. दुसरीकडे सायना नेहवाल आणि पुरुष गटात एचएस प्रणॉय यांना पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
भारताला दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळवून देणारी एकमेव बॅडमिंटनपटू असणाऱ्या सिंधूने शुक्रवारी सिंगापूर ओपनमध्ये महिला एकेरीत चीनच्या हान युई हिला मात दिली. 62 मिनिट चाललेल्या या सामन्यात सिंधूने तीन पैकी दोन सेट जिंकत विजय मिळवला. यावेळी युईने सामन्याची सुरुवात चांगली केली. पहिला सेट युईने 17-21 च्या फरकाने जिंकला. ज्यानंतर मात्र सिंधूने पुढील दोन्ही सेट 21-11 आणि 21-19 च्या फरकाने जिंकत सामनाही जिंकला.
प्रणॉयसह सायनाही पराभूत
भारताचा आघाडीचा पुरुष बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय मात्र उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभूत झाला. त्याला जपानच्या कोडाई नाराओकाने 21-12, 14-21 आणि 18-21 च्या फरकाने मात दिली. त्यामुळे पहिला सेट जिंकूनही सामना प्रणॉयला गमवावा लागला. दुसरीकडे सायना नेहवाललाही जपानच्याच अया ओहोरीने पराभूत केलं. तब्बल 1 तास 3 मिनिटं चाललेल्या या सामन्यात सायना 13-21, 21-15 आणि 20-22 च्या फरकाने पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे प्रणॉय आणि सायना दोघांचेही स्पर्धेतील आव्हान संपले आहे. आता भारताच्या साऱ्या आशा पीव्ही सिंधूवर असणार आहेत.