लंडन : हार्दिक पांड्या, रिषभ पंतच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं निर्णायक सामन्यात इंग्लंडचा पाच विकेट्सनं पराभव केला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने दिलेल्या 260 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची दमछाक झाली. परंतु, हार्दिक पांड्या आणि रिषभ पंत यांच्या जोडीनं संघाचा डाव सावरून भारताच्या विजयाचा पाया रचला.
दरम्यान, हार्दिक पांड्या आणि युजवेंद्र चहल यांच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या संघानं गुडघे टेकले. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या संपूर्ण संघ 45.5 षटकात 259 धावांवर ढेपाळला. इंग्लंडकडून जोस बटलरनं (60 धावा) एकाकी झुंज दिली.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 45.5 षटकांत 259 धावांवर सर्वबाद झाला. भारताला एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी आजच्या सामन्यात 260 धावा कराव्या लागतील. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरनं सर्वाधिक 60 धावा केल्या. बटलरशिवाय जेसन रॉयनं 41 धावा, मोईन अलीनं 34 धावा, क्रेग ओव्हरटननं 32 धावा केल्या. तसेच बेन स्टोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोननं प्रत्येकी 27-27 धावांचं योगदान दिलं. भारताकडून हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी करत 7 षटकात 24 धावा देत 4 विकेट्स घेतले. हार्दिकच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ही सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. त्यांच्याशिवाय युझवेंद्र चहलनं तीन आणि मोहम्मद सिराजनं दोन तर रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली.