नवी दिल्ली : बर्मिंगहममध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेआधी भारताच्या पदकाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घालणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार नाही. काही दिवसांपूर्वीच जागतिक ऍथलेटिक्समध्ये रौप्य पदकाची कमाई करणारा नीरज दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत खेळू शकणार नाही.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी बर्याचदा चांगली होते. अनेकदा भारत पदकतालिकेत पहिल्या तीनमध्ये असतो. टोकियो ऑलिम्पिक गाजवणारा नीरज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकेल अशी खात्री क्रीडा रसिकांना वाटत होती. मात्र आपण दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार नसल्याचं खुद्द नीरजनं सांगितलं आहे.
जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेनंतर नीरज चोप्राचं एमआरआय स्कॅन करण्यात आलं. त्यात स्नायूला दुखापत झाल्याचं निदान झालं. डॉक्टरांनी नीरजला महिनाभर आराम करण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच नीरजनं राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रकुल स्पर्धेला 5 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. याच दिवशी भालाफेक स्पर्धा होईल. नीरजनं राष्ट्रकुलमध्ये खेळणार नसल्यानं आता भालाफेक प्रकारात भारताच्या आशा डी. पी. मनू आणि रोहित यादव यांच्यावर असतील.