कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंना मात 5-0 च्या फरकाने एक दमदार असा विजय मिळवला आहे. यावेळी पीव्ही सिंधू, किदम्बी श्रीकांत अशा दिग्गज बॅडमिंटनपटूंच्या दमदार खेळाच्या भारताने ही कामगिरी केली आहे. भारताच्या सर्वच बॅडमिंटनपटूंनी पाचही सामन्यात सरळ सेट्समध्ये विजय मिळवत पाकिस्तानला मात दिली.
सर्वात आधी भारताच्या सुमीत रेड्डी आणि आश्विनी पोनप्पा या जोडीने मिश्र सामन्यात पाकिस्तानच्या मुहम्मद इरफान आणि गझला सिद्दीकी यांना 21-9 आणि 21-12 च्या फरकाने मात देत 1-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर पुरुष एकेरीचा सामना पार पडला. यामध्ये भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने पाकिस्तानच्या मुराद अलीला 21-7 आणि 21-12 अशा सरळ सेट्समध्ये मात देत भारताला 2-0 ची आघाडी मिळवून दिली.
पीव्ही सिंधूचा विजय, भारताची विजयी आघाडी
ग्रुप ए मधील तिसरा सामना महिला एकेरीचा होता. ज्यात भारताची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू मैदानात उतरली. तिने पाकिस्तानच्या महूर शेहजाद हीला 21-7 आणि 21-6 अशा सरळ सेट्समध्ये सहज मात देत सामना जिंकला आणि भारताला 3-0 ची विजयी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अखेरच्या दोन सामन्यात पुरुष दुहेरीत सात्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या प्रसिद्ध जोडीने पाकिस्तानच्या मुराद अली आणि मुहम्मद इरफान यांना 21-12 आणि 21-9 च्या फरकाने मात देत भारताला 4-0 ची आघाडी मिळवून दिली. अखेरच्या सामन्यात महिला दुहेरीत भारताच्या ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी पाकिस्तानच्या महूर शेहजाद आणि गझला सिद्दकी यांना 21-4 आणि 21-5 अशा मोठ्या फरकाने मात देत सामना जिंकला आणि भारताला पहिल्या दिवशी पाकिस्तानवर 5-0 ने विजय मिळवून दिला.
पहिल्या दिवशी भारताची चांगली सुरुवात
टेबल टेनिसच्या महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत मनिका बत्रानं मुशफिकुह कलामचा 11-5 अशा फरकानं पराभव केलाय. या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये मनिका बत्रानं प्रतिस्पर्धी खेळाडू मुशफिकुह कलामवर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही आक्रमक खेळी करत मुशफिकुह कलामला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. ज्यामुळं दुसरा सेटही तिनं एकतर्फी जिंकला. दरम्यान, महिला दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय जोडी रिथ टेनिसन आणि श्रीजा अकुलानं दमदार कामगिरी केली. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारतीय जोडीनं दक्षिण आफ्रिकेच्या लैला एडवर्ड्स आणि दानिशा पटेलला पराभूत करत कॉमनवेल्थ मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर भारताचा बॉक्सर शिव थापा याने पाकिस्तानच्या सुलेमान बलोचला याला 5-0 च्या फरकाने मात देत 63 किलो वजनी गटात पहिला विजय मिळवला आहे.