हावेरी : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यामध्ये शुक्रवारी पहाटे सदर अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समजते की, शिवमोग्गाहून मिनी बसने काही भाविक बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी आले होते. देवीचे दर्शन घेऊन परत येत असताना
हावेरी जिल्ह्यातील बागडी तालुक्यातील गुंडेनहल्ली क्रॉसजवळ बस चालकाला झोप आल्याने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर थांबलेल्या ट्रकला पाठीमागून मिनी बसने जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये बसचा चक्काचूर झाला.
सर्व मृत शिमोगा जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील आहेत. मृतांमध्ये परशुराम (वय ४५) भाग्या (४०) नागेश (५०) विशालाक्षी (4४०), अर्पिता (१८) सुभद्राबाई (६५), पुन्या (५०), चालक आदर्श (२३), मानस (२४), रूपा (४०) मंजुळा (५०) यांच्यासह अन्य महिला पुरुष व मुलांचा समावेश आहे.
अपघातामध्ये बसमधील १४ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचे मृतदेह बाहेर काढणे देखील कठीण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना बसमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.