बेळगाव : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची नात सौंदर्या हिनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. 30 वर्षीय सौंदर्या या बंगळुरुच्या एमएस रामय्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होत्या. त्यांचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना एक सहा महिन्यांचं बाळ देखील आहे. माउंट कार्मेल कॉलेजजवळील एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये त्यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. येडियुरप्पा यांच्या मोठ्या कन्या पद्मावती यांची सौंदर्या ही थोरली मुलगी. सौंदर्या यांच्या आत्महत्येनं राज्यभरात एकच खळबळ उडाली असून त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौंदर्याने शुक्रवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी १० च्या सुमारास कामावर आलेल्या मोलकरणीने त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र बराचवेळ झाला तरी दरवाजा आतून न उघडल्याने मोलकरणीने सौंदर्याचे पती डॉ. नीरज यांना फोनवरून याची माहिती दिली. ते घरी आल्यावर दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी सौंदर्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. बॉवरिंग हॉस्पिटलमध्ये सौंदर्या यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण समोर येईल असे पोलिसांनी म्हटले आहे. सौंदर्या बंगळूरमधील एका खासगी रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. त्या आपल्या पती डॉ. नीरजसह राहत होती. सौंदर्याचे पती सुद्धा डॉक्टर आहेत.
