बेंगळूर : कर्नाटक राज्याचा स्वतंत्र लाल पिवळा ध्वज फडकवण्यासाठी बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याचिकाकर्ते गडाद यांनी लाल पिवळा ध्वज फडकवण्यासाठी कर्नाटक राज्याला परवानगी द्यावी अशी न्यायालयांना विनंती केली होती. कर्नाटकाचे लेखक पाटील पुटप्पा व तात्कालीन एडवोकेट जनरल यांच्या समितीने केलेली शिफारस व राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय विचारात घेऊन कर्नाटकाच्या स्वतंत्र ध्वजाच्या मागणीचा विचार करावा अशी त्यांनी विनंती केली होती.
मात्र उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन के अरविंद यांनी राज्यासाठी स्वतंत्र ध्वजाचा विचार करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. भारत हे एक संघराज्य आहे. तिरंगा हा देशाचा राष्ट्रीय ध्वज आहे. देशातील प्रत्येक राज्याला स्वतंत्र ध्वज पाठवण्यास कायद्यात मुभा नाही. परंतु काही कन्नडीग सरकारी कार्यालयास सार्वजनिक ठिकाणी लाल पिवळा ध्वज लावण्याचा आग्रह धरून सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. गडाद यांनी आपली स्वतंत्र ध्वजाची मागणी कायम असल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे सांगितले.