बेंगळुरू : कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी नवी दिल्ली येथे माजी पंतप्रधान एच. डी देवेगौडा आणि केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची भेट घेऊन राज्यातील विविध विषयांवर चर्चा केली.
राज्याच्या राजकारणात अनेक वाद सुरू असतानाच मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी रात्री जेवणाच्या बहाण्याने नवी दिल्ली येथे घेतलेली ही भेट कुतूहलाचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि केपीसीसीच्या अध्यक्षपदाच्या बदलाची जोरदार चर्चा रंगली होती. हायकमांडच्या इशाऱ्यानंतर सारे काही थंडावले. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत असतानाच मंत्र्यांच्या हनीट्रॅपच्या प्रयत्नाचे प्रकरण राज्याच्या राजकारणात आणखी एक चर्चेचा विषय बनला आहे. या सर्व घडामोडीनंतर दिल्ली दौऱ्यावर आलेले मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यासोबत डिनर मीटिंग घेतल्याने मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.