
पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिचा सासरा राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे हे दोघे फरार होते. त्यांनी पलायन केले त्यावेळी त्यांना काही जणांनी मदत केली. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यात कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील यालाही अटक करण्यात आली आहे. यासोबतच एक माजी सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या एका माजी सदस्याचाही यात समावेश आहे.
प्रीतम वीरकुमार पाटील (४७, रा. कोगनोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक), मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे (६०, रा. वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (५५, रा. लोणावळा), अमोल विजय जाधव (३५, रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा), राहुल दशरथ जाधव (४५, रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अटक केलेल्या पाच जणांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. आरोपी हगवणे फरार असताना नेमक्या काय हालचाली झाल्या, कोणकोण सहभागी होते, याचा तपास पोलीस करत आहेत. या अटकेनंतर आणखी काही महत्त्वाची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय पदाधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ
प्रीतम पाटील हा कर्नाटकातील माजी उर्जामंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा आहे. वीरकुमार पाटील हे २८ वर्षे काँग्रेसचे आमदार होते. बंडू लक्ष्मण फाटक हा मुळशी तालुक्यातील शिरोली चांदोली या गावाचा माजी सरपंच आहे. मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे हा वडगाव मावळ ग्रामपंचायतीचा माजी सदस्य व भाजपचा वडगाव मावळ शहराचा माजी अध्यक्ष आहे. बंडू भेगडे याची पत्नी मंगल भेगडे या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत. पुसेगाव येथील अमोल जाधव आणि राहुल जाधव हे शेतकरी असून त्यांच्याकडे हगवणे यांनी बैल सांभाळण्यासाठी दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta