
बेंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाच्या विजयोत्सवादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजीपी) हेमंत निंबाळकर यांची बदली करण्यात आली आहे, असे अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी सांगितले.
आरसीबी संघाच्या विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते आणि बुधवारी संध्याकाळी स्टेडियमसमोर चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये ११ चाहते ठार झाले आणि ५६ जण जखमी झाले.
गुप्तचर यंत्रणेतील अपयश हे चेंगराचेंगरीच्या घटनेचे कारण होते, अशा आरोपांच्या पार्श्वभूमीवर हेमंत निंबाळकर यांची बदली करण्यात आली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. गुप्तचर विभागाने सरकार किंवा पोलिस विभागाला आरसीबी सत्कार समारंभ आणि विजय यात्रेत एकाच वेळी इतके लोक येतील असा कोणताही संकेत दिला नव्हता. त्यामुळे राज्य सरकारने गुप्तचर विभागाचे एडीजीपी हेमंत निंबाळकर यांच्याविरुद्ध बदलीचे हत्यार वापरले आहे. हेमंत निंबाळकर यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर रविकुमार यांची तात्काळ नियुक्ती करण्याचा आदेश जारी केला आहे.
चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी बेंगळुरूचे पोलिस आयुक्त बी. दयानंद आणि इतर चार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले.
Belgaum Varta Belgaum Varta