
बंगळूर : कर्नाटकातील कारवार किनाऱ्यावर, आयएनएस कदंबा या महत्त्वाच्या नौदल तळाजवळ चिनी बनावटीचा जीपीएस ट्रॅकर लावलेला एक स्थलांतरित सीगल (समुद्री पक्षी) आढळून आल्याने स्थानिकांमध्ये कुतूहल आणि संशय निर्माण झाला आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील तिम्मक्का गार्डन परिसरात या पक्ष्याच्या पाठीवर असलेले अनोखे उपकरण (जीपीएस) नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ वन विभागाच्या सागरी विभागाला माहिती दिली.
प्राथमिक तपासणीत हा जीपीएस ट्रॅकर चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसअंतर्गत असलेल्या रिसर्च सेंटर फॉर इको-एन्व्हायर्नमेंटल सायन्सेसचा असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार, स्थलांतरित पक्ष्यांच्या हालचाली, खाद्य सवयी आणि स्थलांतर मार्गांचा अभ्यास करण्यासाठी अशा ट्रॅकिंग उपकरणांचा संशोधनात नियमित वापर केला जातो.
कारवारचे वरिष्ठ पोलीस अधिकारी दीपन एम.एन. यांनी सांगितले की, “वन विभागाच्या किनारी सागरी पथकाने हा पक्षी शोधला असून सध्या चौकशी सुरू आहे. आम्ही त्यांच्याशी समन्वय साधत आहोत.”
एका अहवालानुसार, जीपीएस उपकरणातून मिळालेल्या माहितीतून हा सीगल आर्क्टिक प्रदेशासह १०,००० किमीहून अधिक अंतर पार करून कर्नाटकच्या किनाऱ्यावर पोहोचल्याचे समोर आले आहे.
संशोधन प्रकल्प की हेरगिरीचा प्रयत्न?
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राथमिक निष्कर्षांनुसार हा प्रकार संशोधन प्रकल्पाशी संबंधित असण्याची शक्यता आहे आणि सध्या कोणतीही हेरगिरीची ठोस चिन्हे दिसत नाहीत. मात्र, इतर शक्यता पूर्णतः नाकारण्यासाठी जीपीएस उपकरणाची तांत्रिक तपासणी केली जाणार आहे.
“सध्याच्या घडीला हे स्थलांतरित पक्ष्यांच्या संशोधनाचा भाग वाटतो. सविस्तर पडताळणीनंतरच अंतिम निष्कर्ष काढला जाईल,” असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. यासोबतच, अभ्यासाचा उगम, कालावधी आणि व्याप्ती जाणून घेण्यासाठी संबंधित चिनी संस्थेशीही संपर्क साधण्यात आला आहे.
हा पक्षी ज्या ठिकाणी आढळला, त्या स्थानामुळे अनेक यंत्रणांचे लक्ष वेधले गेले आहे. आयएनएस कदंबा हा भारतीय नौदलाचा अत्यंत धोरणात्मक तळ असून येथे विमानवाहू जहाजे आणि पाणबुड्यांसह महत्त्वाची युद्धनौके तैनात आहेत. सध्या सुरू असलेल्या विस्तारकामानंतर आयएनएस कदंबा हा पूर्व गोलार्धातील सर्वात मोठा नौदल तळ ठरणार आहे.
मात्र, या परिसरात ही पहिलीच घटना नाही. नोव्हेंबर २०२४ मध्ये कारवारजवळील बायठकोल बंदर परिसरात जीपीएस ट्रॅकर लावलेला एक वॉर ईगल आढळला होता. त्या प्रकरणातही कोणताही संशयास्पद प्रकार आढळला नव्हता आणि तो वन्यजीव संशोधनाशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta