सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार वाद
बंगळूर : स्वयंपाक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात झालेल्या व्यत्ययासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांचा आरोप आज विधानसभेत मोठ्या वादाला कारणीभूत ठरला. या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली आणि सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
शून्यकालात काँग्रेसचे आमदार एच. डी. रंगनाथ यांनी हा मुद्दा उपस्थित करत व्यावसायिक वापरासाठी गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याचे सांगितले. काही ठिकाणी सिलिंडर दुप्पट दराने विकले जात असल्याची तक्रारही त्यांनी केली आणि सरकारने यावर कोणती पावले उचलली आहेत, असा प्रश्न उपस्थित केला.
त्यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. एच मुनियप्पा सभागृहात नसल्याने अध्यक्षांनी त्यांच्याकडून उत्तर मागवण्यास सांगितले. त्यानंतर सभागृहात आलेल्या मुनीयप्पा यांनी सांगितले की त्यांनी तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली असून घरगुती सिलिंडर पुरवठ्यात कोणतीही अडचण नाही. ग्राहकांनी गॅसचा मितव्ययी वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.
मात्र, रांगनाथ यांनी सिलिंडर टंचाईसाठी केंद्र सरकारच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणाला जबाबदार ठरवले. यावर भाजप सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. युद्धस्थितीमुळे पुरवठ्यावर परिणाम झाला असून प्रत्येक गोष्टीसाठी केंद्र सरकारला दोष देणे चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतल्याशिवाय काँग्रेसला चैन पडत नाही, अशी टीकाही भाजप सदस्यांनी केली.
दरम्यान मंत्री प्रियांक खर्गे यांनीही केंद्र सरकारवर टीका करत फेब्रुवारी ९ रोजी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सिलिंडरची कमतरता नसल्याचे सांगितले होते, असे नमूद केले. जर कोणतीही अडचण नसेल तर ‘एस्मा’ लागू करण्याची गरज का पडली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या वक्तव्यावरून भाजप सदस्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि सभागृहातील गोंधळ आणखी वाढला.
यानंतर मुख्यमंत्री सिध्दरामय्या सभागृहात आल्यानंतर वातावरण काहीसे शांत झाले. त्यांनी शून्यकालात अनावश्यक राजकारण करू नये, असे सांगितले. मात्र भाजपचे आमदार सुनिल कुमार यांनी युद्धस्थितीत अशा प्रकारची वक्तव्ये करणे योग्य नसल्याचे सांगत राज्य सरकारवरही टीका केली.
दरम्यान विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनीही या विषयावर राजकारण करू नये असे सांगितले. मुख्यमंत्री चळवळीला प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप त्यांनी केला. यावरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि अशोक यांच्यातही जोरदार वाद झाला.
शेवटी विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांनी हस्तक्षेप करून गोंधळ शांत केला आणि अन्नमंत्री मुनीयप्पा यांना उत्तर देण्यास सांगितले.
घाबरण्याची गरज नाही : मुनीयप्पा
राज्यात प्रत्येक कुटुंबाला दरमहा एक घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिला जाईल, त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे मुनीयप्पा यांनी स्पष्ट केले. तेल कंपन्यांनी घरगुती सिलिंडरचा पुरवठा सुरळीत असल्याची हमी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
रुग्णालये, शाळा आणि वसतिगृहांसाठीही आवश्यक सिलिंडर उपलब्ध करून दिले जातील. युद्धाच्या परिस्थितीत सर्वांनी सहकार्य करून गॅसचा मितव्ययी वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta