बंगळूर : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कथित छळाला कंटाळून समाज कल्याण विभागातील एका अधिकाऱ्याने कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पावगड तालुक्यात घडली आहे.
मल्लिकार्जुन (वय ६०), पावगड तालुका समाज कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक, असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते या पदावर कार्यरत होते. विशेष म्हणजे, त्यांची सेवा मुदत येत्या ३१ मार्च रोजी संपणार होती. निवृत्तीपूर्वी अवघ्या काही दिवसांतच घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी मल्लिकार्जुन हे नेहमीप्रमाणे कार्यालयात हजर झाले होते. संध्याकाळपर्यंत ते कार्यालयातच थांबले होते. सर्व कर्मचारी घरी गेल्यानंतर त्यांनी कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ संदेश रेकॉर्ड केल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या छळामुळे हा टोकाचा निर्णय घेत असल्याचे म्हटले आहे.
मूळचे पावगड तालुक्यातील गुंडरळहळ्ळी गावचे रहिवासी असलेल्या मल्लिकार्जुन यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.
मल्लिकार्जुन यांचा शेवटचा संदेश
व्हिडिओ संदेशात मल्लिकार्जुन यांनी आपल्या कुटुंबाचा उल्लेख करताना, “माझी आई, पत्नी आणि मुलांनी मला खूप साथ दिली. मला अजून त्यांना मदत करायची होती, पण ते शक्य होत नाही,” असे भावनिक शब्दांत म्हटल्याचे समजते.
तसेच, समाज कल्याण विभागाचे संयुक्त संचालक कृष्णप्पा यांच्या छळामुळेच हा निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, कुटुंबीयांनी कोणताही सूड उगवू नये, देव आणि कायदा यांच्याकडूनच न्याय मिळेल, असेही त्यांनी व्हिडिओत नमूद केल्याचे सांगितले जाते.
सहाय्यक संचालकांनी फेटाळले आरोप
दरम्यान, या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सहाय्यक संचालक कृष्णप्पा यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत, “मी कधीही मल्लिकार्जुन यांना वैयक्तिक त्रास दिलेला नाही,” असे स्पष्ट केले.
बंगळूर येथील मुख्य कार्यालयातून मल्लिकार्जुन यांच्याविरोधात गैरव्यवहाराची तक्रार प्राप्त झाली होती. त्या आधारे त्यांना नोटीस देण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती; मात्र चौकशी अद्याप सुरू झाली नव्हती, असेही त्यांनी नमूद केले. तसेच, “त्यांच्या निवृत्तीला अवघे दहा दिवस उरले होते. त्यांच्या पेन्शनवर कोणताही परिणाम होणार नव्हता. उलट, त्यांच्या फायद्यासाठी प्रस्ताव मी स्वतः मंजूर केला होता,” असेही कृष्णप्पा यांनी सांगितले.
या घटनेबाबत संशय व्यक्त करत त्यांनी सत्य बाहेर यावे, अशी मागणी केली आहे.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पावगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि समाज कल्याण विभागातील अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta