
बेळगाव : सार्वजनिक ठिकाणी अल्ला हू अकबर अशी घोषणा देणार्या मुस्कान या विद्यार्थिनीचे अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अल जवाहिरी याने कौतुक करणे निषेधार्ह आहे. सरकारने हे प्रकरण हलक्यावर घेऊ नये, त्याची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी श्रीराम सेना संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी केली. अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अल जवाहिरीने मुस्कानचे कौतुक करणारा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रमोद मुतालिक म्हणाले, ही बाब खूप गंभीर आहे. ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल कायदाचा प्रमुख बनलेल्या अल जवाहीर यांच्यावरही बंदी घालण्यात आली आहे. तरीही त्याचा व्हीडिओ कुठून आला? कसा आला? तो मंड्याच्या मुस्कानपर्यंत कसा पोहोचला? याची चौकशी व्हायला पाहिजे. मुस्कान आणि तिच्या वडिलांना अटक करून ही चौकशी करायला हवी. महाराष्ट्रातील एका मुस्लिम आमदाराने मुस्कानच्या घरी भेट देऊन तिला मोबाईल दिला आहे. तो का दिला? कोणी दिला? याची चौकशी मोबाईल जप्त करून केली पाहिजे. अल कायदाने आमच्या देशात नाक खुपसण्याची गरज नाही. आमचा देश तालिबान नाही. कुराणाच्या आधारावर हा देश चालत नाही तर घटनेच्या आधारावर चालतो. मुस्कानचे कोणी कौतुक करण्याची गरज नाही. हिजाब वादावर तोंड बंद ठेवून गप्प राहिले पाहिजे असेही मुतालिक यांनी सुनावले.
Belgaum Varta Belgaum Varta