बेळगाव : राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज खात्याचे मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांच्यावर 40 टक्के कमिशनचा आरोप करणार्या कंत्राटदाराने उडुपी येथे लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. माझ्या आत्महत्येला मंत्री ईश्वराप्पा हेच जबाबदार असून माझ्या पत्नी व मुलांना संरक्षण द्या. त्यांची काळजी घ्या मदत करा, असेही त्यांनी मृत्यूपूर्वी माध्यमांना पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे. संतोष के. पाटील (वय 35, रा. समर्थनगर, हिंडलगा बेळगाव) असे आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचे नाव आहे.
सन 2021 मध्ये हिंडलगा येथील लक्ष्मी यात्रा झाली. यात्रेपूर्वी गावातील सुमारे 4 कोटी रुपयांची रस्त्याची कामे संतोष पाटील यांनी केली होती. त्याचे बिल देण्यासाठी संबंधित खात्याकडून टाळाटाळ केली जात होती. 28 मार्च रोजी संतोष पाटील यांनी थेट ईश्वराप्पा यांच्यावर आरोप करत 40 टक्के कमिशन मागितल्याचे माध्यमांना सांगितले होते. तसे पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले होते. इतके होऊनही त्यांचे बिल न मिळाल्याने सोमवारी 11 रोजी रात्री त्यांनी उडुपी येथील शांभवी लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला आहे.
आत्महत्येपूर्वी त्यांनी बेळगावच्या एका चॅनेलच्या प्रतिनिधीला मेसेज पाठवला आहे. या मेसेजमध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझ्या मृत्यूला मंत्री के. एस. ईश्वराप्पा हेच जबाबदार आहेत. त्यांना शिक्षा व्हायला हवी. माझ्या सर्व आशा-आकांक्षावर त्यांनी पाणी फेरले आहे. त्यामुळेच मी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. माझी पत्नी व मुलाला सरकार म्हणजे पंतप्रधानांनी व मुख्यमंत्र्यांनी व आमचे लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुराप्पा तसेच इतर सर्व नेत्यांनी माझ्या कुटुंबाला मदत करावी, असे हात जोडून विनंती करतो. माध्यम प्रतिनिधींना कोटी कोटी धन्यवाद. माझ्या सोबत आलेले माझे मित्र संतोष आणि प्रशांत हे प्रवासाला जाऊया म्हटल्यानंतर माझ्यासोबत बेळगाववरून उडुपीला आलेले आहेत. त्यांचा माझ्या मृत्यूशी कोणताही संबंध नाही, असा उल्लेख केला आहे.
याबाबत मंत्री ईश्वराप्पा यांनी आपल्याला आत्महत्येबद्दल काही माहिती नाही. त्यामुळे याबद्दल बोलणार नाही, असे माध्यम प्रतिनिधींना सांगितले. गृहमंत्री आरग ज्ञानेन्द्र यांनी ही डेथनोट नसून फक्त एक संदेश आहे, त्यामुळे याची चौकशी करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे माध्यमांना सांगितले.
Check Also
मराठी विद्यानिकेतन स्नेहसंमेलन कार्यक्रमांमध्ये ऐनवेळी बदल
Spread the love बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेचे स्नेहसंमेलन 27 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी …