बेंगळुरू : एक धक्कादायक घटना कर्नाटकच्या बंगळुरु शहरातून समोर आली आहे. एका किकबॉक्सरला बॉक्सिंग सामन्यादरम्यान रिंगमध्ये गंभीर दुखापत झाल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. 23 वर्षीय मृत किक बॉक्सर हा म्हैसूरचा रहिवाशी असून निखिल एस. असं त्याचं नाव आहे. दरम्यान निखिलच्या आई-वडिलांनी तक्रार दिल्यानंतर सामने आयोजित करणाऱ्या आयोजकांविरुद्ध पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बंगळुरु येथील ज्हाना ज्योति नगर या परिसरात घडली. या ठिकाणच्या पाई इंटरनेशनल बिल्डिंगमध्ये के1 राज्य स्तरीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप ही स्पर्धा सुरु होती. यामध्ये म्हैसूरच्या निखिलनेही सहभाग घेतला होता. यावेळी बॉक्सिंग रिंगमध्ये निखिल त्याचा प्रतिस्पर्धी बॉक्सरचा सामना करत असताना अचानक एका पंचनंतर थेट जमिनीवर कोसळतो. ज्यानंतर तो पुन्हा वर उठतच नाही. त्याला तिथून थेट बंगळुरुच्या जीएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.
आयोजक फरार
निखिलवर त्याच्या कुटुंबियांनी म्हैसूर येथे अंत्यसंस्कार केले. ज्यानंतर निखिलच्या आई-वडिलांनी कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दिली. त्यानंतर बंगळुरुच्या ज्ञानभारती पोलिस स्थानकात पोलिसांनी आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्पर्धेदरम्यान आयोजकांनी डॉक्टर तसंच रुग्णवाहिका अशी कोणतीच सुविधा ठेवली नव्हती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आयोजक नवीन रविशंकर सध्या फरार असून त्याचा शोध सुरु आहे.