Wednesday , December 10 2025
Breaking News

भाजपकडून खालच्या पातळीचे राजकारण

Spread the love

 

सिध्दरामय्यांचा आरोप, दुसऱ्या दिवशीही सिध्दरामय्या विरोधात भाजपची निदर्शने

बंगळूर : पूरग्रस्त कोडगू जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सिध्दरामय्या यांच्या गाडीवर अंडी फेकल्याच्या प्रकरानंतर आज दुसऱ्या दिवशीही चिक्कमंगळूर जिल्ह्यातील मुत्तिनकोप्पा आणि शृंगेरीजवळ त्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी भाजप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. यावेळी सिध्दरामय्या यांनी भाजपनेते खालच्या पातळीचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला व आपण यामुळे खचून जाणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.
कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही जिल्ह्यातील कोप्पा तालुक्यातील मुत्तीनकोप्पा गावात काळे झेंडे दाखवण्यात आले. चिक्कमंगळूरच्या दौऱ्यावर असलेल्या सिद्धरामय्या यांच्या विरोधात दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू होते. हिंदुद्वेषी सिद्धरामय्या यांनी या पवित्र भूमीत येऊ नये, असे सांगत सरावरकर यांचे छायाचित्र लावून भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
या दरम्यान, भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी शृंगेरी सर्कलजवळ काळे झेंडे दाखवून आपला रोष व्यक्त केला. कडेकोट बंदोबस्त असतानाही कार्यकर्त्यांनी सिध्दरामय्यांविरुध्द निदर्शने सुरू ठेवल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना संघर्ष करावा लागला.
पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले की, भाजप गलिच्छ राजकारण करत आहे. त्यामुळे आम्ही खचून जाणार नाही. आम्हीही राजकारण करतो. सत्य सांगणे चुकीचे आहे का, असा त्यांनी सवाल केला.
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विचारधारेचे रक्षण करण्यास आपण समर्थ असल्याचे सांगितले. दगड आणि अंडी मारून त्याचा प्रतिकार करणे हे भ्याडपणाचे लक्षण असल्याचे सांगत भाजपवर सडकून टीका केली.
मडिकेरी येथे त्यांच्या गाडीवर अंडी फेकणाऱ्या हिंदुत्ववाद्यांच्या वर्तनाचा व्यापक संताप आणि निषेध झाल्यानंतर विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनीही राज्याचे पोलीस खाते संघ-परिवाराच्या हातचे बाहुले असल्याबद्दल ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली. पोलिसांच्या कर्तव्यातील हलगर्जीपणाचा निषेध करत या महिन्याच्या २६ तारखेला कोडगू येथील एसपी कार्यालयाला घेराव घालणार असल्याची त्यांनी घोषणा केली. भाजपच्या गुंडांना आम्ही संघर्षातून उत्तर देऊ, असे ट्विट सिद्धरामय्या यांनी केले आहे.
मडिकेरी येथे सिद्धरामय्या यांच्यावर अंडी फेकल्याप्रकरणी गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केपीसीसीचे कार्याध्यक्ष ध्रुवनारायण यांनी म्हैसूरमध्ये केली. हा सरकारी प्रायोजित कार्यक्रम होता आणि त्यांना पोलिस याआधी अटक करू शकले असते. सिद्धरामय्या हे लोकप्रिय नेते असल्याने भाजप त्यांना लक्ष्य करत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या गाडीवर अंडी फेकण्याच्या कृत्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांनीही रस्त्यावर उतरून निषेध केला. राज्याच्या अनेक भागात निदर्शने करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सिद्धरामय्या यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या भाजपच्या गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान, अंडी फेकल्याप्रकरणी कुशलनगर ग्रामीण स्टेशन पोलिसांनी ९ आरोपींना अटक केली. सिद्धरामय्या यांच्या गाडीवर अंडी फेकणारे मनू, कृष्णप्पा, मंजुनाथ, नित्यानंद, प्रवीण, गौतम, भास्कर नायक, मणिकंथा, लक्ष्मीनारायण यांना कुशलनगर पोलिसांनी अटक करून जेएमएफसी न्यायाधीशांसमोर हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना जामीन मंजूर केला.
सिद्धरामय्या यांच्या गाडीवर अंडी फेकल्याच्या प्रकरणाचा कॉंग्रेस नेत्यांनी निषेध केला आहे. काल अतिवृष्टीत नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात आलेले विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या गाडीवर कुशलनगरजवळील गुड्डेहोसूर येथे अंडी फेकण्यात आली.
सिद्धरामय्या तेथून जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून गाडीवर अंडी फेकली. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना संघर्ष करावा लागला. कोडगू येथे हिंदूंचा नरसंहार करणाऱ्या टिपूचा शिष्य सिद्दू खान, गो बॅक अशा आशयाचे फलक घेवून निषेध केला आणि थितीमातीजळ काळे झेंडे दाखवले.
चिक्कमंगळूरला जाण्यापूर्वी सिध्दरामय्या यांनी भाजप आणि आरएसएसवर टीका केली. कायद्याची अंमलबजावणी करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे, ते सोडून खेळ खेळत आहात का? असा सवाल त्यांनी पोलिसांना केला.
……………………………………………..
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर मडिकेरी येथे अंडी फेकल्याच्या घटनेनंतर पोलीस महासंचालकांना पुरेशी सुरक्षा प्रदान करण्यास सांगितले आहे. मला या घटनेची माहिती आहे. सिद्धरामय्या यांना पुरेशी सुरक्षा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडलेली नाही. – अरग ज्ञानेंद्र, गृहमंत्री

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *