१३ जण जखमी, केंद्र, राज्याकडून अनुक्रमे दोन, पाच लाखाची मदत
बंगळूर : तुमकुरपासून जवळच असलेल्या एनएच-४८ वर बालेनहळ्ळी गेट येथे गुरुवारी पहाटे एका क्रूझर जीपने ट्रकला धडक दिल्याने चार महिला आणि दोन मुलांसह नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आणि तेरा जण जखमी झाले.
बळी पडलेले सर्व मजूर होते आणि ते रायचूर जिल्ह्यातील कुरकुंडासह विविध गावांतील रहिवासी होते. ते बांधकाम उद्योगात नोकरीच्या शोधात बंगळुरला जात होते.
कृष्णप्पा, चालक सुजाता, विनोद, लक्ष्मी अशी मृतांची नावे असून उर्वरित पाच जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना बंगळुर येथील निम्हान्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मात्र, उर्वरित जखमीना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी वाय. एस. पाटील, पोलीस अधीक्षक राहुलकुमार शहापूरवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या वळणावर ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात क्रूझरच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि अखेरीस पहाटे साडेचारच्या सुमारास ट्रकला धडक दिली. मल्टी-युटिलिटी व्हेईकलमध्ये त्यांच्या सामानासह २४ लोक होते. कळंबेल्ला पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
शोक व्यक्त करताना राज्याचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र म्हणाले की, ही दुर्दैवी घटना आहे. ते तुमकूर जिल्ह्याचे पालक मंत्री आहेत. त्यांनी एसपी यांच्याशी फोनवर बोलून जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या.
पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शोक व्यक्त करून पीडितांच्या वारसाना भरपाई जाहीर केली आहे.
कर्नाटकातील तुमकुर जिल्ह्यात झालेला अपघात हृदय हेलावणारा आहे. शोकाकुल कुटुंबियांच्या संवेदना. जखमींसोबत प्रार्थना, पीएमएनआरएफकडून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये दिले जातील. जखमींना ५० हजार रुपये दिले जातील, असे पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकार प्रत्येकी ५ लाख रुपयांची भरपाई देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे.
बंगळुरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व रायचूर येथील गरीब मजूर होते. या घटनेने अतिशय दु:ख झाले आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये आणि जखमींच्या उपचारासाठी ५० हजार रुपयांची भरपाई यापूर्वीच जाहीर केली आहे. ते म्हणाले की, राज्य सरकारने पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला असून याबाबत तुमकूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे.
जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार आहे. जखमींना चांगले उपचार मिळावेत यासाठी व्यवस्था करण्यात येत असून दोघांना बंगळुर येथील निम्हन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta