रवीचा विविध प्रकरणात हात; बड्या नेत्यांशी संबंधाचा आरोप, चौकशीचे आदेश
बंगळूर : राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजवणाऱ्या सँट्रो रवी प्रकरणाच्या संदर्भात कुमारकृपा गेस्ट हाऊस अधिकाऱ्याची उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. के. एस. मंजुनाथ उर्फ सँट्रो रवी याच्यावर हुंडाबळीसाठी छळ, फसवणूक आणि अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले असून अनेक राजकीय नेत्यांशी त्याचे संबंध असल्याचे उघड झाले आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिस पथकाने जोरदार प्रयत्न चालविले असून तो फरारी असल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरमधील कुमारकृपा गेस्ट हाऊस हे सँट्रो रवीचे कार्यस्थळ असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कुमारकृपा गेस्ट हाऊसच्या एका अधिकाऱ्याला अटक केली आहे. सँट्रो रवी कुमारकृपा गेस्ट हाऊसमधून बदलीसह काही व्यवहार करत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर कुमारकृपा अतिथीगृहाचे सहायक व्यवस्थापक देवराज यांची सरकारने बदली केल्याची माहिती आहे.
कर्नाटक राज्य पर्यटन विकास अंतर्गतअसलेले कुमारकृपा गेस्ट हाऊसमध्ये कोणतेही पद न सोपवता देवराज यांची बदली करून केंद्रीय कार्यालयात अहवाल देण्याचे आदेश जारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सँट्रो रवीच्या अटकेसाठी शोध
शहर पोलिसांनी सँट्रो रवीच्या अटकेसाठी सखोल तपास सुरू केला आहे. के. एस. मंजुनाथ उर्फ सँट्रो रवी याच्यावर हुंडाबळीसाठी छळ, फसवणूक आणि अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्हा दाखल होऊन पाच दिवस उलटून गेले तरी संट्रो रवी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. फसवणूक, हुंडाबळी, छळ आणि बलात्काराच्या आरोपाखाली दोन जानेवारी रोजी सँट्रो रवीविरुद्ध विजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्याविरुद्ध तक्रारी दाखल झाल्याने आरोपी सँट्रो रवी फरार झाला.
रवीच्या अटकेसाठी एसीपी शिवशंकर यांच्या नेतृत्वाखाली डीसीपी मुथुराज यांच्या मार्गदर्शनाखाली तीन निरीक्षक आणि पाचहून अधिक उपनिरीक्षकांचा समावेश असलेली विशेष टीम तयार केली आहे. पोलीस बंगळुर आणि म्हैसूरमध्ये सँट्रो रवीचा शोध घेत आहेत. भागीदार संस्थेकडून माहिती गोळा करत आहेत. दरम्यान, सँट्रो रवीने त्याच्या वकिलामार्फत म्हैसूर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.
व्हायरल ऑडिओनंतर चर्चेत बदलीबाबत डीवायएसपी यांच्याशी झालेल्या संभाषणाचा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात सँट्रो रवीचे नाव चर्चेत आले. यानंतर त्यांचे अनेक प्रभावशाली राजकीय नेत्यांसोबत गप्पा मारतानाचे फोटो व्हायरल झाले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, मंत्री एस. टी. सोमशेखर, आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांच्याशीच नाही तर उच्च पदावरील अधिकाऱ्यांशीही त्याचे झालेले व्हॉट्सअप चॅट व्हायरल होत आहेत. त्याला शस्त्र बनवून विरोधी पक्ष काँग्रेस आणि धजद भाजपवर टीका करत आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सँट्रो रवीच्या विरोधात चौकशीचे निर्देश दिल्याचे सांगितले. बोम्मई म्हणाले, की मी म्हैसूर पोलीस आयुक्तांना सँट्रो रवी उर्फ मंजुनाथविरुद्धच्या सर्व प्रकरणांची व्यापक चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. रवीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याचे राजकारण्यांशी गेल्या २० वर्षांतील संबंध आहेत.
म्हैसूरमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सँट्रो रवी यांने कांही जणांसोबत फोटो काढला या आधारावर बोलणे योग्य नाही. अशा गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेले लोक फोटो काढतात. सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांशीच नव्हे तर विरोधी पक्षांच्या नेत्यांशीही त्यांचा संबंध आहे. त्यामुळे फोटोंच्या आधारे बोलण्यापेक्षा त्याच्या प्रकरणांची चौकशी केली तर सर्व काही उघड होईल, असे ते म्हणाले.
सँट्रो रवीने काय केले, कोणत्या गुन्हेगारी कारवायांमध्ये त्याचा सहभाग आहे? गेल्या २० वर्षांत तो कोणाच्या संपर्कात होता? मी पोलिसांना नेमक्या प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आम्ही सँट्रो रवी यांच्यावरील खटले गांभीर्याने घेतले आहेत. आम्ही त्याची चौकशी करू, पुरावे गोळा करू आणि त्याला शिक्षा करू, कोणालाही सोडण्याचा प्रश्नच नाही. सर्व काही बाहेर येऊ द्या, सर्वांचे रंग उघड होतील, असे ते म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta