बेंगळुरू : कर्नाटकातील भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लाचखोरीच्या प्रकरणात कर्नाटक हायकोर्टाने त्यांना 5 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला. त्यांना 48 तासांच्या आत लोकायुक्तांसमोर हजर राहण्याचे निर्देश देखील दिले आहेत.
भाजप आमदार के. मदल विरुपक्षप्पा यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने कथित लाच प्रकरणात त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. दरम्यान, विरुपक्षप्पा यांना अटकपूर्व जामीन मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत करून आज (दि.७) रॅली काढली.
लोकायुक्तांच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने मदल विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत मदल याला एका व्यावसायिकाकडून ४० लाखांची लाच घेताना ३ मार्च रोजी अटक केली होती. एका स्मार्ट वॉचमुळे हे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार आमदार विरूपक्षप्पा यांचे मुख्य आरोपी म्हणून नाव होते. २ आणि ३ मार्चला लोकायुक्तांनी टाकलेल्या छाप्यात प्रशांत यांच्या कार्यालयातून २ कोटी रूपये आणि मादल विरूपक्षप्पा यांच्या निवासस्थानातून ६ कोटी १० लाख ३० हजार रूपये जप्त करण्यात आले होते. आज काटक हायकोर्टाने मदल विरुपक्षप्पा यांना 5 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला.