बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली.
या दुसऱ्या यादीमुळे बेळगाव जिल्ह्यातील अनेक काँग्रेस नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या यादीत धारवाडमधून माजी मंत्री विनय कुलकर्णी, निपाणीतून माजी आमदार काकासाहेब पाटील, गोकाकमधून भाजपचे राज्यसभा सदस्य खा. इरण्णा कडाडी यांचे दूरचे नातेवाईक डॉ. महांतेश कडाडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, अरभावी, अथणी, रायबाग मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केलेले नाहीत.विधानसभा निवडणुकीची चुरस शिगेला पोहोचली असतानाच, अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने आज आपली दुसरी उमेदवार यादी घोषित केली. अ. भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस आणि काँग्रेस निवडणूक समितीचे प्रभारी मुकुल वासनिक यांनी ही यादी जाहीर केली. मात्र या यादीमुळे जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना, इच्छुकांना धक्का बसला आहे.
पहिल्या यादीत जिल्ह्यातील 9 तर दुसऱ्या यादीत 4 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. आणखी पाच मतदारसंघांसाठी उमेदवार निवड करायची आहे. चारपैकी तीन मतदारसंघात काँग्रेसची बंडखोरी निश्चित मानली जात आहे.सौंदत्ती मतदार संघात सौरव चोप्राचे तिकीट हुकले असून, तेथे विश्वास वैद्य यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे सौंदत्तीत काँग्रेसमध्ये बंडखोरी निश्चित मानली जात आहे. त्याचप्रमाणे कित्तूरमध्ये माजी मंत्री डी. बी. इनामदार कुटुंबियांना ‘जोर का झटका धीरेसे’ लागला आहे. कित्तूर मतदारसंघात बाबासाहेब पाटील यांना काँग्रेसने तिकीट दिले आहे. त्यामुळे या ठिकाणी इनामदार यांची सून लक्ष्मी बंडखोरी करून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
गोकाक मतदारसंघात काँग्रेसने वेगळा पत्ता टाकला आहे. तेथे डॉ. महांतेश कडाडी यांना तिकीट दिले आहे.
पारंपारिक विरोधक अशोक पुजारी यांचे तिकीट हुकले आहे. रमेश जारकीहोळी यांच्या विरोधात पंचमसाली समाजाचा उमेदवार काँग्रेसने रिंगणात उतरवलाय. विशेष म्हणजे भाजपचे राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांचे दूरचे नातेवाईक डॉ. महांतेश कडाडी यांना तिकीट देऊन काँग्रेसने लिंगायत पंचमसाली समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.निपाणीत माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे भाग्य खुलले आहे तर रमेश जारकीहोळी यांचे जवळचे मित्र उत्तम पाटील यांना तिकीट हुकले आहे. आता मंत्री शशिकला जोल्ले यांच्या विरोधात काकासाहेब आखाड्यात उतरणार असले तरी, निपाणीत काँग्रेसला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. धारवाडमधून अपेक्षेप्रमाणे माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना तर कलघटगी मतदार संघात माजी मंत्री संतोष लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते सिद्दरामय्यांचा मतदार संघ राहिलेल्या बदामीत भीमसेन चिम्मनकट्टी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, अरभावी, अथणी, रायबाग या पाच मतदारसंघातील उमेदवार काँग्रेसने अद्याप जाहीर केलेले नाहीत. तेथे बंडखोरीची शक्यता आणि जातीय समीकरणांची जुळवाजुळव करत उमेदवार जाहीर करण्याचा सावध पवित्रा काँग्रेसने घेतल्याचे दिसून येते.
Belgaum Varta Belgaum Varta