बंगळूर : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांना पैशांऐवजी १० किलो तांदूळ दिला जाईल, असे अन्नमंत्री के. एच. मुनियप्पा यांनी सोमवारी सांगितले.
आज शहरात पत्रकारांशी बोलताना मंत्री म्हणाले की, राज्यातील ११४ तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. या तालुक्यांना १० किलो तांदूळ वाटपाची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दुष्काळी तालुक्यांमध्ये पाच किलो तांदळासाठी रोख रक्कम देण्यात आली होती. परंतु आता एकूण दहा किलो तांदूळ पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली आहे.
दरम्यान, मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी तांदूळ खरेदीच्या मुद्द्यावर सांगितले की, तांदूळ खरेदी पुढील एका आठवड्यात अंतिम होईल. आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड ही राज्ये तांदूळ पुरविण्यासाठी पुढे सरसावली आहेत. निविदा प्रक्रिया सुरू आहे. किंमतीबाबत बोलणी सुरू आहेत. लवकरात लवकर दहा किलो तांदूळ पुरविण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोफत योजनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला उत्तर देताना मंत्री मुनियप्पा म्हणाले की, देशात ३५ ते ३७ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. यूपीएच्या काळात अन्न सुरक्षा कायदा आणला गेला. कामाशिवाय कोणीही राहू नये म्हणून आम्ही नरेगा योजना आणली. अन्न सुरक्षा कायद्याचा लोकांना फायदा होत असल्याचे ते म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta